Thu, Dec 25, 2025

ISRO च्या शिरपेचात मानाचा तुरा; श्रीहरीकोटामधून सर्वात जड उपग्रह ‘ब्लू बर्ड ब्लॉक-2’चे प्रक्षेपण

Written by:Rohit Shinde
Published:
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इसरो ने आज अमेरिकन दळणवळण उपग्रह ब्लु बर्ड ब्लॉक २ चं यशस्वी प्रक्षेपण केलं. आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ स्थानकावरून भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ८ वाजून ५५ मिनिटांनी त्याचं प्रक्षेपण करण्यात आलं.
ISRO च्या शिरपेचात मानाचा तुरा; श्रीहरीकोटामधून सर्वात जड उपग्रह ‘ब्लू बर्ड ब्लॉक-2’चे प्रक्षेपण

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने बुधवारी इतिहास रचला आहे. ‘इस्रो’च्या ‘बाहुबली’ रॉकेटने आपल्या खांद्यावर सर्वात जड ब्लू बर्ड ब्लॉक-2 उपग्रह घेऊन आकाशात यशस्वी उड्डाण केले. ‘इस्रो’चे LVM3 M6 मिशन आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून लॉन्च करण्यात आले आणि ते अमेरिकन बेस्ड AST SpaceMobile सोबतच्या व्यावसायिक करारा अंतर्गत ब्लू बर्ड ब्लॉक-2 उपग्रहाला कक्षेत घेऊन गेले. ब्लूबर्ड ब्लॉक-2 उपग्रह हा भारतीय भूमीवरून LVM3 द्वारे प्रक्षेपित केलेला सर्वात वजनदार पेलोड देखील आहे.

इस्रोची पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इसरो ने आज अमेरिकन दळणवळण उपग्रह ब्लु बर्ड ब्लॉक २ चं यशस्वी प्रक्षेपण केलं. आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ स्थानकावरून भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ८ वाजून ५५ मिनिटांनी त्याचं प्रक्षेपण करण्यात आलं. अमेरिकी ब्ल्यूबर्ड उपग्रह हा भारतीय अंतराळयानाने प्रक्षेपित केलेला आजवरचा सर्वात जड उपग्रह असून हे प्रक्षेपण अतिशय अचूकतेने झाल्याबद्दल इसरो चे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी सर्व सहभागी तंत्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे.

उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात इसरो चं अभिनंदन केलं आहे. भारताची जड उपग्रह प्रक्षेपीत करण्याची क्षमता या प्रक्षेपणाद्वारे जगासमोर आली असून भारत आता व्यावसायिक प्रक्षेपणक्षेत्रातही आघाडी घेत असल्याबद्दल त्यांनी इसरो ची  प्रशंसा केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही इसरो च्या सर्व वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांचं  अभिनंदन केलं असून या प्रक्षेपणातून आत्मनिर्भर भारतासाठी आपले प्रयत्न दिसून येतात असं समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

संबंधित प्रक्षेपण इस्रोसाठी का महत्वाचे ?

LVM3 हे ‘इस्रो’चे सर्वात विश्वासार्ह आणि शक्तिशाली प्रक्षेपण वाहन आहे. याला बाहुबली रॉकेट देखील म्हणतात. याचा उपयोग जड उपग्रहांना कक्षेत पोहोचवण्यासाठी केला जातो. या प्रक्षेपण वाहनात सॉलिड, लिक्विड आणि क्रायोजेनिक अशा तीन प्रकारच्या इंजिनांचा समावेश आहे. याचे एकूण वजन 640 टन आहे आणि उंची 43.5 मीटर आहे. जिओसिंक्रोनस ट्रांसफर ऑर्बिट (GTO) मध्ये हे 4,200 किलोग्राम पर्यंतचे पेलोड घेऊन जाण्यास सक्षम आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याला भारताच्या अंतराळ क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हटले आहे. पंतप्रधानांनी ट्वीट करून म्हटले की, “LVM3-M6 चे यशस्वी प्रक्षेपण, अमेरिकेच्या ब्लू बर्ड ब्लॉक-2 या उपग्रहासहीत भारतीय भूमीवरून प्रक्षेपित केलेला सर्वात वजनदार उपग्रह त्याच्या नियोजित कक्षेत स्थापित करण्यात आला, हा भारताच्या अंतराळ प्रवासातील एक अभिमानास्पद टप्पा आहे.

हे भारताच्या हेवी-लिफ्ट प्रक्षेपण क्षमतेला अधिक बळकट करते आणि जागतिक व्यावसायिक प्रक्षेपण बाजारात आपली वाढती भूमिका अधोरेखित करते. हे ‘आत्मनिर्भर भारत’ च्या दिशेने केलेल्या प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. आपल्या मेहनती अंतराळ शास्त्रज्ञांचे आणि अभियंत्यांचे अभिनंदन. अंतराळ क्षेत्रात भारत उत्तरोत्तर उंच भरारी घेत आहे!”