पुणे जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस; भुशी डॅम ओव्हरफ्लो

Written by:Rohit Shinde
Published:
पुणे जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात सध्या जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे भूशी धरण ओव्हरफ्लो झाले असून धरणांत होणारी पाण्याची आवक देखील वाढली आहे.
पुणे जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस; भुशी डॅम ओव्हरफ्लो

राज्यात मान्सून सक्रिय झाल्याने पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. आज, 16 जून रोजी पुणे ते कोल्हापूर घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 32.4 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. यासोबतच पुणे शहर आणि चिंचवड परिसरात अनुक्रमे 60 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

कोकणातील सर्व जिल्ह्यांत मान्सूनचा पाऊस बरसत आहे. मुंबई शहर, ठाण्यालाही पावसाने झोडपून काढलं आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भागात पावसाची संततधार सुरू आहे. तरी विदर्भात पाऊस अद्याप तितक्या ताकदीने सक्रिय झालेला नाही. परंतु लवकरच मान्सून विदर्भात प्रवेश करेल आणि नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरांत पाऊस कोसळेल.

पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस

पुणे शहरात काही प्रमाणात पावसाने उसंत घेतली असली तरीही घाटमाथ्याच्या भागात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे. प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शहराच्या धरणसाखळीत पावसाचा जोर वाढला आहे, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये पाऊस पडत आहे. मागील 24 तासांत खडकवासला धरणात 18 मिमी, पानशेतमध्ये 25 मिमी, वरसगावमध्ये 26 मिमी आणि टेमघरमध्ये 23 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. सद्यः स्थितीत खडकवासला प्रकल्पामध्ये 5.25 टीएमसी पाणीसाठा असून, हा पाणीसाठा मागील वर्षीपेक्षा 1.35 टीएमसी इतका जादा आहे. लोणवळ्यात गेल्या 24 तासांत 143 मिमी पाऊस कोसळला

भूशी धरण भरले, पर्यटकांना भूरळ

पर्यटकांचं आकर्षण असणाऱ्या लोणावळ्यातील भुशी धरण अखेर ओव्हरफ्लो झालं आहे. गेल्या तीन दिवस तुफान पाऊस कोसळत आहे. गेल्या 24 तासांत ही 143 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यंदा आत्तापर्यंत 791 मिमी पाऊस कोसळला आहे, गेल्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत केवळ 303 मिमी पाऊस झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत 488 मिमी अधिकचा पाऊस बरसल्यानं यंदा भुशी धरण लवकर ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे आता परिसरात लवकच पर्यटक मोठी गर्दी निर्माण करू शकतात.

 

 

 

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews