राज्यातील काही भागात आज मुसळधार पाऊस; काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज

Written by:Rohit Shinde
Published:
मुंबईसह कोकण परिसरात पावसाची तीव्रता चांगलीच वाढली आहे. शिवाय पूर्व आणि मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
राज्यातील काही भागात आज मुसळधार पाऊस; काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज

राज्यातील काही भागांत पावसाने जोर पकडला असून, श्रावणातील सरी बरसताना दिसत आहेत. आज मुंबई, कोकण, घाटमाथा तसेच अन्य भागांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काहींना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 24 तासांसाठीचा हवामान विभागाने दिलेला अंदाज समजून घेऊया…

मुंबई, कोकणपट्ट्यात मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबईत आज वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून, हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहू शकतात. मुंबई आणि उपनगरांसाठी यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे. यामुळे सार्वजनिक वाहतुकीसह दैनंदिन हालचालींवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात न जाण्याचा सल्ला देण्यात आला असून, अत्यावश्यक महत्वाच्या कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
नवी मुंबई आणि ठाणे शहरांसाठीही हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. येथेही विजांचा गडगडाट आणि जोरदार वाऱ्यांची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या भागात ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, त्यामुळे झाडे कोसळणे किंवा विजेच्या तारांचे नुकसान होण्याचा धोका आहे. नागरिकांनी सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात पाऊस बरसणार

खरंतर या काळात कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. काही भागांत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषतः घाटमाथ्यावरील आणि नद्यांच्या काठावर असलेल्या परिसरात पाण्याची पातळी वाढू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांनी या काळात विशेष काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

मध्य महाराष्ट्रातील धाराशिव, लातूर आणि आजुबाजूच्या भागांत पावसाचा जोर राहिल. विदर्भातील पूर्वेकडील जिल्हे भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि नागपूर या जिल्ह्यांत काही दिवस पावसाचा जोर वाढत जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी ही खऱ्या अर्थाने आनंदाची बातमी मानली जात आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews