कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

Written by:Rohit Shinde
Published:
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात हवामान विभागाकडून आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागरिकांनी या काळात सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्रातील पावसाबाबत हवामान विभागाचा नवा अंदाज समोर आला आहे.भारतीय हवामान खात्याने कोकण, मराठवाडा, विदर्भासह मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या भागांमधील 21 जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम असून अनेक जिल्ह्यांमध्ये धो धो पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतामधील पिकांना या काळात मोठा धोका संभवतो. शिवाय, आपत्तीच्या काळात नागरिकांना देखील आवश्यक ती सतर्कता बाळगावी, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

राज्याच्या अनेक भागात पावसाचा अंदाज

आज कोकण-गोवा, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे.

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला यलो अलर्ट देण्यात आला आहे, तर पुणे आणि सातारा घाटमाथ्यासह पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली आणि सोलापूरला देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय अहमदनगर आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना आणि विदर्भाती अमरावती, चंद्रपूर व नागपूर या जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या भागातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यभरात पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान

गेल्या काही दिवसांत राज्याच्या अनेक भागात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. नांदेड, बीड, अहिल्यानगर या जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले असून पिकांची मोठी हानी झाली आहे. सोलापूर, धाराशिव जिल्ह्यातही अशीच काहीशी परिस्थिती आहे. पुढील काळात आणखी कशी स्थिती राहते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राजस्थानच्या काही भागांतून मान्सून माघारी घेतल्याचे जाहीर केले आहे. मुंबईतून मान्सून पूर्णपणे माघार घेण्यासाठी अजून एक महिना लागेल, कारण बंगालच्या उपसागरातून अनेक नवीन कमी दाबाचे पट्टे तयार होतील, ज्यामुळे पुढील महिनाभर मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे.