Marathi News

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत आज मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज काय?

Written by:Rohit Shinde
Published:
पुढील 24 तास हे चार जिल्ह्यांसाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण या ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दक्षिण गुजरात आणि पश्चिम महाराष्ट्रातही पुढील काही दिवस जोरदार पाऊस पडणार आहे.
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत आज मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज काय?

राज्यातील काही जिल्ह्यांसाठी पुढील 24 तास हे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण या ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दक्षिण गुजरात आणि पश्चिम महाराष्ट्रातही पुढील काही दिवस जोरदार पाऊस पडणार आहे. पालघर, वलसाड, नवसारी, सुरत, वडोदरा आणि अहमदाबाद या भागांत पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, ज्यामुळे अचानक पूर येण्याची शक्यता आहे. पुणे परिसरातील घाटमाथा आणि दक्षिण कोकणातदेखील पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

काही ठिकाणी पुराचा धोका

मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने थोडी विश्रांती घेतली असली, तरी ठाणे, कल्याण-डोंबिवली, पालघर, रायगड आणि तळकोकणात जोरदार पावसाचा कहर सुरूच आहे. घाटमाथ्यावर सतत कोसळणाऱ्या पावसामुळे तलाव भरू लागले असून, काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आधीच झालेल्या मुसळधार पावसासोबत धरणांतून सोडलेल्या पाण्यामुळे महापुराचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे.

कोकणाच्या किनारी भागाला इशारा

कोकणच्या किनारपट्टीवर पुन्हा एकदा पावसाने आपले रौद्र रूप दाखवले आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये 25 ते 27 जून दरम्यान जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईकरांसाठी मात्र थोडा दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत. 25 जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता असली तरी, पुढील दोन दिवस मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मराठवाडा, विदर्भाला दिलासा मिळणार?

मराठवाडा आणि विदर्भासाठी हवामान विभागाने आज विशेष इशारा जारी केला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली येथे विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळणार आहेत. बीड, लातूर आणि धाराशिव येथे तुरळक पावसाची शक्यता आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, वर्धा आणि वाशिम या भागांत पुढील तीन दिवस वीजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाला आता दिलासा मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews