विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाचा अंदाज समोर

Written by:Rohit Shinde
Published:
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. आज अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाचा अंदाज समोर

12 ते 14 जुलैदरम्यान राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील चार दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून, नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. हवामान विभागाचा अंदाज सविस्तर जाणून घेऊ…

14 जुलैंपर्यंत पावसाचा जोर राहणार!

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. आज अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, हवामान विभागाने रेड अलर्ट घोषित केला आहे. संपूर्ण राज्यात 14 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचे चित्र राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

आज विदर्भासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात काही निवडक ठिकाणी वीजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, त्यामुळे या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्रात पावसाची संततधार 

बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, जालना आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून, हवामान खात्याने या भागांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट लागू असलेल्या सर्व जिल्ह्यांतील नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी सावध राहण्याचं आणि घराबाहेर जाताना आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार अशा स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. या काळात काही ठिकाणी पुरस्थिती निर्माण होण्याची चिन्हं आहेत, त्याचबरोबर या काळात नागरिकांना सतर्कतेचे आणि काळजी घेण्याचे  आवाहन करण्यात आले आहे.