मुंबईला पावसाचा तडाखा, जनजीवन विस्कळीत; पुढील काही तास धोक्याचे!

Written by:Rohit Shinde
Published:
मुंबई शहर, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. मुंबईकरांचं दैनंदिन जीवन सततच्या पावसामुळे विस्कळीत आहे. लोकल सेवेवर देखील परिणाम झा आहे. पुढील काही तास पावसाचे असणार आहेत.
मुंबईला पावसाचा तडाखा, जनजीवन विस्कळीत; पुढील काही तास धोक्याचे!

मुंबई शहाराला पावसाने चांगलंच झोडपून काढले. यामुळे मुंबईकरांचं दैनंदिन जीवन प्रभावित झालं असून मुंबईची जीवनवाहिनी असणाऱ्या लोकल रेल्वेच्या सेवेवर देखील याचा परिणाम झाला आहे. अनेक भागांत पाणी साचल्याने वाहनचालक आणि नागरिकांची तारांबळ उडताना दिसत आहे, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत पुढील काही तास आणखी धोक्याचे आहेत.

पावसाची संततधार कायम

मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाचा जोर वाढला आहे. तर दक्षिण मुंबईतही मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर अंधेरी, वांद्रे, गोरेगावर परिसरात सगळीकडे अंधार झालेला आहे. मुंबई शहरात रात्रभर तुफान पाऊस झाला. तर आज सकाळी देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. सीएसएमटी, जेजे उड्डाणपूल परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. किंग्ज सर्कल परिसरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी वडाळा परिसरात काहीकाळ पावसाचं पाणी साचलं होतं. चुनाभट्टी भागात देखील पाणी साचल्याची माहिती मिळत आहे. धावजी केणी रोड येथील स्वदेशी मिल कामगार वसाहतीत पहिल्याच पावसात घरात पाणी घुसल्याचे दिसून आले.

पुढील 24 तास पाऊस बरसणार

26 मे रोजी मुंबईत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. शहरात विजेच्या कडकडाटासह हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. कमाल तापमान सुमारे 29 अंश सेल्सिअस राहील, तर आर्द्रता सुमारे 80 टक्केपर्यंत जाईल. वाऱ्याचा वेग अंदाजे 40 ते 50 किमी प्रतितास राहण्याची शक्यता आहे. पावसाचा काही भागांतील वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. नवी मुंबईत पुढील 24 तासांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवेतील आर्द्रता सुमारे 86 टक्क्यांवर राहणार आहे. काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.

नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन

या पावसात नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आलं आहे. महापालिकेने आवश्यक उपाययोजनांची तरतुद करण्यास सुरूवात केली आहे. रेल्वेच्या वेळापत्रकावर मुंबईत मोठा परिणाम झाला असून अनेक लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. पुढील काही तास ही स्थिती अशीच राहण्याचा अंदाज आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews