राज्यात १६ ते २१ ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा, राज्य आपत्कालीन केंद्राकडून ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

Written by:Astha Sutar
Published:
कोकण किनारपट्टी १६ ते २० ऑगस्ट दरम्यान ५०-६०किमी/ताशी वा-यासह समुद्रात खवळलेली स्थिती राहणार असून मच्छीमारांनी या कालावधीत समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात १६ ते २१ ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा, राज्य आपत्कालीन केंद्राकडून ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Weather : राज्यात यावर्षी पावसाने लवकर सुरुवात केली. आज मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकण व ठाणे येथे मुसळधार पाऊस बरसत आहे. तसेच ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीसाठी उच्च लाटांचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं समुद्र किनारी न जाण्याचा आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले असताना, आता पावसाबाबत एक मोठी व महत्वाची बातमी समोर येत आहे. राज्यात १६ ते २१ ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने म्हटले आहे.

अतिवृष्टीचा इशारा कुठे?

दरम्यान, कोकण व मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीसह अत्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, मराठवाडा मध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता. वीज चमकणे, गडगडाट, वादळी वारे (40) 50 किमी/ताशी) यांची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तसेच कोकण किनारपट्टी: १६ ते २० ऑगस्ट दरम्यान ५०-६०किमी/ताशी वा-यासह समुद्रात खवळलेली स्थिती राहणार आहे.

मच्छीमारांसाठी इशारा…

सचेत ॲपमार्फत नागरिकांना सूचना आपत्तीपासून सतर्क राहण्यासाठी सद्यस्थितीमध्ये नागरीकांना सचेत ॲपमार्फत अलर्ट संदेश पाठविले जात आहेत. आपत्तीच्या अनुषंगाने प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना आपत्कालीन परिस्थिती करिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच कोकण किनारपट्टी: १६ ते २० ऑगस्ट दरम्यान ५०-६०किमी/ताशी वा-यासह समुद्रात खवळलेली स्थिती राहणार असून मच्छीमारांनी या कालावधीत समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी…

दुसरीकडे राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. रायगड जिल्ह्यातील अंबा नदीने धोका पातळी तसेच कुंडलीका नदी व रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी आणि कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली असून याबाबत नागरिकांना सूचित करण्यात आले आहे. नागरिकांनी पूरस्थिती पासून सुरक्षित राहण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सूचना देण्यात आल्या असून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

आपत्कालीन केंद्राकडून हेल्पलाईन नंबर जारी…

मंत्रालयीन स्तरावरील राज्यस्तरीय आपत्कालीन कार्यकेंद्र २४x७ सुरू आहे. मंत्रालय नियंत्रण कक्षासाठी फोन नं. ०२२-२२०२७९९० किंवा ०२२-२२७९४२२९ किंवा ०२२-२२०२३०३९ तसेच मोबाईल – ९३२१५८७१४३ उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचेही राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.