काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर अनुभवून झाल्यानंतर आज, 01 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांत पावसाला थोडासा ब्रेक मिळाला आहे. मराठवाडा आणि विदर्भात देखील पावसाने दोन दिवसांपासून ब्रेक घेतल्याचे चित्र आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार आज या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता नाही. त्यामुळे नागरिकांना गेले काही दिवस जाणवलेला मुसळधार पावसाचा तडाखा आज कमी होणार आहे.
पावसाची तीव्रता कमी; ‘या’ भागाला यलो अलर्ट
राज्यात गेल्या आठवड्यापासून धो धो कोसळणाऱ्या पावसाचा जोर आता ओसरला असला तरी अनेक भागात आजही पावसाचा अंदाज आहे. तीव्रता कमी झाली असली तरी आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. बहुतांश जिल्ह्यामध्ये आज हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून मराठवाड्यातील नांदेडसह विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
हे ही वाचा
कोकणातील मुंबई, ठाणे पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह सातारा घाट, पुणे घाट आणि कोल्हापूर घाट परिसरात मध्यम स्वरापाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, आहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्याला देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बहुतांश भागात उघडीप; मोठा दिलासा
विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, भडारा, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. या जिल्ह्यांमध्ये पाऊस विश्रांती घेणार असून हवामान सामान्य राहण्याची शक्यता आहे. या भागाला पावसापासून दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी निर्माण झालेली पुरस्थिती आता ओसरताना दिसत आहे. शिवाय सरकारी पातळीवर पंचनामे करून शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवली जात आहे.