राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. पावसाने थैमान घातले आहे. काही भागात अतिवृष्टी झाली. मराठवाड्यात पडणाऱ्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून पिके वाहून गेली आहेत. आणखी काही दिवस पावसाचा हा जोर असाच राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
30 आणि 31 ऑगस्टला मुसळधार पावसाचा अंदाज
ऑगस्ट महिन्याचा शेवट जवळ येत असतानाही पावसाची तीव्रता कमी झालेली नाही. संपूर्ण महिनाभर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा येथे पावसाने दमदार उपस्थिती दाखवली. आज, 30 ऑगस्ट रोजीदेखील काही भागांत पुन्हा एकदा मुसळधार सरींची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसत आहे.
विदर्भ-मराठवाड्यात मुसळधार पाऊस बरसणार
यवतमाळ, अमरावती, वर्धा,चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकाना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. सध्या अप्पर वर्धा धरणात 92 टक्के इतका जलसाठा आहे. सततच्या पावसामुळे हे मोठं धरण भरले आहे. चाळीसगावात मुसळधार पावसानंतर गिरणा धरण 90 टक्क्यांवर मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले. चाळीसगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे गिरणा धरण 90 टक्के भरले. मन्याड, वलठाण, कोदगाव, हातगाव असे एकूण सात प्रकल्प शंभर टक्के भरले आहे.
पावसामुळे विदर्भात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यांतील तब्बल 6.08 लाख हेक्टरवरील तूर, कपाशी, सोयाबीन, संत्रा व भाजीपाला पिके पाण्यात. फक्त ऑगस्ट महिन्यातच 4.58 लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. जूनमधील अतिवृष्टीत 1,08,913 शेतकऱ्यांचे 98,209 हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. आणखी काही दिवस पावसाचा हा जोर असाच राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
मुंबईसह कोकणाला पावसामुळे सतर्कतेचा इशारा
कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या महत्त्वाच्या जिल्ह्यांसाठी आज हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू असून दुपारी तसेच रात्रीच्या सुमारास मुसळधार सरींची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या भागात आजचे तापमान 24 ते 29 अंश सेल्सियसदरम्यान राहील. समुद्र उग्र राहण्याचा अंदाज असून 25 ते 30 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे सुटतील. त्यामुळे मासेमारांनी समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना या काळात सतर्कता बाळगावी लागणार आहे.






