पुरस्थितीचा सामना करणाऱ्या मराठवाड्यासमोरील संकट आता अधिक गडद होण्याची शक्यता आहे. पुढचे काही दिवस म्हणजे, 26 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या काळात मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर 27 सप्टेंबर रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे धाराशिव, सोलापूर, लातूर, अहिल्यानगर तिकडे विदर्भातील नांदेड या जिल्ह्यांना या काळात सर्वाधिक धोका संभवतो.
मराठवाडा-विदर्भाला पावसाचा सर्वाधिक धोका
बंगालच्या उपसागरात पुढील 24 तासात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. सोबतच, चक्रीय स्थिती असल्याने राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील काही भागात 24 ते 27 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही भागात अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही भागात 26 ते 30 सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर अधिक असणार आहे. त्यामुळे या काळात नागरिकांना विशेष सतर्कता बाळगावी लागणार आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क आणि सज्ज राहण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा
आठवडाभर मुसळधार पाऊस बरसणार!
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील काही भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तसेच कोकण आणि गोव्यातही विजांच्या कडकडाटासह 30-40 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.