पुढील 48 तासांत राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता; गणपती विसर्जनाच्या काळात पावसाचा प्रभाव वाढणार!

Written by:Rohit Shinde
Published:
राज्याच्या बहुतांश भागात पुढील 2 दिवसांत पावसाचा प्रभाव चांगलाच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने तसा इशारा दिला आहे. शिवाय गणेश विसर्जनाच्या काळात देखील राज्यात पावसाचा जोर राहणार आहे.
पुढील 48 तासांत राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता; गणपती विसर्जनाच्या काळात पावसाचा प्रभाव वाढणार!

राज्यात आगामी काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. पुढील 48 तासांत बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा संभाव्य जोर राहणार आहे. दोन जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, पुढील दोन दिवसांत हवामानात मोठा बदल दिसून येऊ शकतो. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आणि सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे देशभरात पावसाची संभाव्यता वाढली आहे.

महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढणार!

गौरी गणपतीचे आज विसर्जन होत आहे आणि या वेळी पावसाचा प्रचंड प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. मुंबई, उपनगर, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईत आज हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, कोल्हापूर, घाटमाथा, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. सातारा, सांगली आणि सोलापूरमध्ये पावसाचा जोर कमी राहणार आहे. जालना, परभणी, बीड, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल.

चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांसाठी ऑरेंज ते रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे आणि कोल्हापूरमध्ये उद्यापासून ऑरेंज अलर्ट राहणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांतही पुढील ४८ तास मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

देशभरात पावसासाठी अनुकूल वातावरण

महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमध्ये पुढील 7 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, विशेषतः 3 ते 5 सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर वाढेल. गणपती विसर्जनाच्या काळात 3 ते 6 सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसामुळे विसर्जनाची तयारी आव्हानात्मक ठरू शकते. सप्टेंबर 2025 मध्ये देशभरात मासिक पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त (109% पेक्षा अधिक) राहण्याची शक्यता आहे. बहुतांश भागांत पावसाचा जोर कायम राहील, तर ईशान्य आणि पूर्व भारतात पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहू शकते. उत्तराखंडसारख्या भागात भूस्खलन आणि फ्लॅश फ्लडची शक्यता व्यक्त केली आहे, ज्याचा परिणाम दिल्ली, दक्षिण हरियाणा आणि उत्तर राजस्थानसारख्या निचांकी भागांवर होऊ शकतो. पुढील 24 तासांत बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते. यासोबतच, एक ट्रफ लाईन उडिसाच्या उत्तरेकडील किनाऱ्यापर्यंत पसरलेली आहे. उत्तर-पश्चिम राजस्थानातही सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews