राज्यातील पावसाबाबत आता मोठी अपडेट समोर येत आहे. पुढील 24 तासांत राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार अशा पावसाचा अंदाज आहे. शिवाय आज 15 सप्टेंबरपासून पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रातून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस माघारी फिरेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
पाऊस परतीच्या मार्गावर; राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज
मान्सून परतीच्या प्रवासावर असून पुढील दोन ते तीन दिवस अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने घाट विभागाला ऑरेंज अलर्ट जारी केलाय. नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास पश्चिम राजस्थानमधून सुरू झाला आहे. यंदा तीन दिवस आधीच परतीचा प्रवास सुरू झाला आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्यातील चारही विभागात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जना आणि सोसाट्याच्या साऱ्यासह अतिजोरदार तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यंदाच्या मान्सूनचा परतीचा प्रवास येत्या १५ सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुढील तीन दिवस सर्वदूर पावसाची शक्यता असल्याचेही विभागाने म्हटले आहे. सध्याच्या कमी दाबाच्या क्षेत्रापाठोपाठ बंगालच्या उपसागरात २० सप्टेंबरच्या दरम्यान आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्या क्षेत्रामुळे राज्यातील पावसात पुन्हा वाढ होऊ शकते. राज्यातून मान्सून माघारी फिरण्याचा सर्वसाधारण कालावधी ५ ते १४ ऑक्टोबर आहे. पावसाची सध्याची स्थिती पाहता राज्यातून मान्सून सर्वसाधारण वेळेआधी माघारी फिरण्याची शक्यता कमी असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्राच्या सर्वदूर मुसळधार पावासाचा अंदाज, काळजी घ्या!
भारतीय हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी केलाय. मराठवाड्यातीलही काही भागांमध्ये आज पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. कोकणात हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केलाय. मुंबईमध्ये रात्रभर पावसाची रिपरिप सुरूच आहे. मुंबईत सकाळी अतिमुसळधार पाऊस सुरू झाला आहे. विजांच्या कटकटाडासह पाऊस सुरू आहे. नागरिकांनी या काळात आवश्यक ती सतर्कता बाळगावी, असे आवाहन हवामान विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.





