Marathi News

सावधान! पुढील ७२ तास धोक्याचे; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळणार!

Written by:Rohit Shinde
Published:
पुढील तीन ते चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विजांच्या कडकडाटास पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आलं आहे.
सावधान! पुढील ७२ तास धोक्याचे; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळणार!

पुढील तीन ते चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विजांच्या कडकडाटास पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आलं आहे. बंगालच्या उपसागरात शुक्रवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. हे क्षेत्र पुढील दोन दिवसांत दक्षिण ओडिशा आणि दक्षिण छत्तीसगडकडे सरकण्याची शक्यता आहे. या क्षेत्राच्या प्रभावामुळे १३ सप्टेंबरला मराठवाड्यात, तर १४ आणि १५ सप्टेंबरला मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सर्वदूर मुसळधार पावसाची शक्यता आहे.

७२ तास मुसळधार पाऊस, सतर्क रहा!

नागरिकांनी अशा परिस्थितीत घराबाहेर न घोंडता सतर्क राहावं; प्रशासन आणि बचाव यंत्रणांनी पूर, व्यापार आणि रहदारी व्यवस्थापनासाठी सज्ज राहावं, ही विनंती संबंधित अधिकाऱ्यांनी केली आहे. नागरिकांनी शक्यतो घराबाहेर न पडता, अलर्टची सतत माहिती घेत, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. फारच महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडता येईल.

15 सप्टेंबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास

यंदाच्या मान्सूनचा परतीचा प्रवास येत्या १५ सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुढील तीन दिवस सर्वदूर पावसाची शक्यता असल्याचेही विभागाने म्हटले आहे. सध्याच्या कमी दाबाच्या क्षेत्रापाठोपाठ बंगालच्या उपसागरात २० सप्टेंबरच्या दरम्यान आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्या क्षेत्रामुळे राज्यातील पावसात पुन्हा वाढ होऊ शकते. राज्यातून मान्सून माघारी फिरण्याचा सर्वसाधारण कालावधी ५ ते १४ ऑक्टोबर आहे. पावसाची सध्याची स्थिती पाहता राज्यातून मान्सून सर्वसाधारण वेळेआधी माघारी फिरण्याची शक्यता कमी असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

मुंबई-पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबईत पावसाचे कमबॅक होणार असून हवामान विभागाने दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुण्यातही पावसाचे पुनरागमन झाले असून पुढील चार दिवस मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा राजधानी मुंबईत पाऊस सक्रिय होणार आहे. हवामान विभागाकडून मुंबईत रविवारी आणि सोमवारी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दोन दिवसात शहरातील विविध भागांत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

पुणे शहरात शनिवारी आकाश सामान्यत: ढगाळ राहणार असून, अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. त्यानंतर पुढील तीन दिवस मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा विभागाने दिला आहे, तर घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतातील पिकांना फटका बसण्याची शक्यता

सोलापुरात आज पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे, सध्या शहरात तुफान पाऊस सुरू आहे, सलग तीन दिवसांपासून शहर आणि परिसरात पाऊस सुरू असल्यानं नागरिकांचे हाल सुरू आहेत, संपूर्ण शहर जलमय झालं आहे. शहरातील साखर पेठ,  मंगळवार बाजार आणि गणेश शॉपिंग सेंटर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत देखील मोठी वाढ झाली आहे.

दुसरीकडे धाराशिवमध्ये देखील विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे,  आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा एकदा धो-धो कोसळत आहे. धाराशिव, तुळजापूर आणि येरमाळा परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मात्र या पावसामुळे आता शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे, पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews