बीड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार; हवामान विभागाचा अंदाज, शाळा-महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी जाहीर

Written by:Rohit Shinde
Published:
बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. बीड, पाटोदा, शिरूर आणि आष्टी तालुक्याला मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे.
बीड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार; हवामान विभागाचा अंदाज, शाळा-महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी जाहीर

बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. बीड, पाटोदा, शिरूर आणि आष्टी तालुक्याला मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. आष्टी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून देवळाली गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे.  आष्टी तालुक्यातील कडा येथे नदीपात्रा शेजारी सापते कुटुंबातील अकरा जण अडकले होते. तसेच शेरी खुर्द येथील काही जण पुरात अडकले होते. त्यांना तातडीने बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून हेलिकॉप्टरची सोय करून सुरक्षित बाहेर काढले आहे.

बीडमध्ये पावसाचा रूद्रावतार

50 वर्षांमध्ये पहिल्यांदाच कडा शहर पाण्याखाली आले आहे. दरम्यान ही परिस्थिती पाहता NDRF च्या टीमला पाचरण केले जात आहे. तर अनेक ठिकाणच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. बीड जिल्ह्यातील सुलेमान देवळा, दौलावडगाव सह परिसरातील 30 गावांचा संपर्क तुटलाय. सततच्या पावसानं नदी नाले दुथडी भरून वाहतायत. तर अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. त्यामध्ये बीडमध्ये परिस्थिती बिकट आहे.

उद्या पुन्हा मुसळधार पाऊस?

हवामान विभागाने उद्या देखील जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. जिल्ह्यातील 16 मध्यम आणि 126 लघु प्रकल्प ओसंडुन वाहत आहेत. तर लहान-मोठा नदी नाले ओढ्यांना पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. आष्टी,शिरूर ,पाटोदा, बीड, वडवणी,गेवराई ,अंबाजोगाई, परळी या तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व खाजगी आणि सरकारी शाळा, अंगणवाडी, आश्रम शाळा महाविद्यालय यांना मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉनसन यांनी म्हटले आहे.

परिस्थिती पाहता नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन आष्टी विधानसभेचे आमदार सुरेश धस यांच्यासह तहसील प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. कडा, परिसरात चोभा निमगाव, धामणगाव, दादेगाव, देविनिमगाव, शेरी, फत्तेवाडगाव, नांदा, रुईनालकोल, या गावांत पाणी शिरलं असून गावचा संपर्क तुटला आहे.