उद्यापासून 23 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार; हवामान विभागाचा धडकी भरवणारा अंदाज

Written by:Rohit Shinde
Published:
आज 19 सप्टेंबर रात्री ते 23 सप्टेंबरपर्यंत राज्यातील अनेक भागांत मुसळधार असा पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. पावसाचा अंदाज सविस्तर जाणून घेऊ...
उद्यापासून 23 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार; हवामान विभागाचा धडकी भरवणारा अंदाज

सर्वत्र परतीच्या पावसाचे वेध लागले आहेत. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. त्यामध्ये हवामान विभागाकडून पावसाबाबत आणखी एक नवा आणि धडकी भरवणारा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 19 सप्टेंबर म्हणजे आजच्या रात्रीपासून 23 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार अशा स्वरूपाचा पाऊस कोसळेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामध्ये अनेक भागात पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक 19 ते 23 सप्टेंबर 2025 या काळात राज्यातील काही जिल्ह्यात विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अलर्ट जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या काळात अहिल्यानगर, पुणे, नाशिक, सातारा, तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात काही भागात पुरस्थिती देखील निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांना विशेष सतर्कता बाळगावी लागणार आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा देखील या काळात सज्ज असणार आहे.

मुसळधार पावसात काळजी घ्या!

मुसळधार पावसाळ्यात निसर्गाचे रौद्ररूप अनुभवायला मिळते. अशा वेळी वीज कोसळणे, पुराचा धोका किंवा ढगफुटी यांसारख्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची आणि कुटुंबाची सुरक्षितता लक्षात घेऊन काही महत्वाच्या खबरदाऱ्या घेणे आवश्यक आहे. वीजा चमकत असताना घराबाहेर उभे राहणे टाळावे. झाडाखाली, मोकळ्या मैदानावर किंवा पाण्यात उभे राहणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. मोबाईल फोनचा वापर, इलेक्ट्रिक उपकरणे वापरणे अशा वेळी टाळावे. घरामध्ये दरवाजे-खिडक्या बंद ठेवून सुरक्षित ठिकाणी राहणे अधिक योग्य ठरते. पुराचा धोका असेल तर प्रशासनाकडून दिलेल्या सूचना नक्की पाळाव्यात.
नदीकाठी, नाल्याजवळ किंवा पाण्याचा प्रवाह जास्त असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे. जर पाणी घरात शिरले तर तात्काळ सुरक्षित स्थळी हलावे. पुरात अडकलेल्या व्यक्तींनी विजेच्या तारा, खांब किंवा ओले भिंतींपासून लांब राहावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा संकटाच्या काळात घाबरून न जाता सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आपत्कालीन क्रमांक, जवळच्या आश्रयस्थळांची माहिती आधीपासून ठेवणे उपयोगी पडते. एकत्रितपणे सतर्कता आणि सजगतेनेच आपण मुसळधार पावसाचा धोका टाळू शकतो.
Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews