शनिवारी म्हणजेच आज राज्यातील काही भागांत जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विविध भागात झालेल्या अतिवृष्टीने बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली, घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अशी स्थिती असताना पावसाचा चिंता वाढवणारा अंदाज समोर आला आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागात अथवा जिल्ह्यांत या पावसामुळे पुरस्थिती देखील उद्भवू शकते.

आज अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा धोका

राज्यातील 9 जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागामार्फत, राज्यात नांदेड, लातूर, धाराशिव, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर या नऊ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट परिसरात 27 सप्टेंबर 2025 रोजीसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

अनेक भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई आणि ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे काळोखा पसरला. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. दुसरीकडे पुणे, जालना आणि इतर काही भागांमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई-ठाण्यात जोरदार पावसाची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. पुढील तीन दिवसही या भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज, 27 सप्टेंबरलाही पाऊस सुरूच असून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर पालघरला यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

धाराशिव जिल्ह्यात पुरस्थिती; पाऊस थांबेना!

धाराशिव जिल्ह्यात पुन्हा पावसाचा कहर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. धाराशिव जिल्ह्यात रात्रभर सुरू असलेल्या पावसाने पुन्हा एकदा कहर केला आहे. या पावसात भूम परंडा परिसरातील नळी, दुधना, बानगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे पुन्हा शेत शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून पुन्हा नद्या धोक्याच्या पातळी बाहेर प्रवाहित झाल्या आहेत. अनेक भागात पुरस्थिती असून हे चित्र आणखी धोकादायक होण्याची शक्यता आहे.