अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर; पाथर्डी तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान

Written by:Rohit Shinde
Published:
अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतोय...पाथर्डी तालुक्याच्या अनेक भागांत पुरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर; पाथर्डी तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान

अहिल्यानगर जिल्ह्यात शनिवारी 13 सप्टेंबरपासून मुसळधार पावसाला सुरूवात झालेली आहे. यामध्ये काही ठिकाणी संततधार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने नद्यांना पूर आले आहेत. गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळित झाले आहे. काही ठिकाणी शाळांना सुट्टी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्ह्यातील अनेक शाळांना सुट्ट्या

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हाधिकारी हे प्राधिकरणाचे अध्यक्ष असून शासनाच्या परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहिर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. जिल्ह्यातील 19 महसूल मंडळांत अतिवृष्टी झालेली असून पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील काही गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

पाथर्डी तालुक्याला पावसाचा फटका

पाथर्डी तालुक्यातील अनेक गावांत ढगफुटीससदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अनेक गावांना जोडणारे पुलं पाण्याखाली गेल्याने सर्वसामान्यांचं जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ, जोगेवाडी, मानेवाडी ढाकनवाडी, पिंपगाव, तप्पा, कुत्तरवाडी भागात कालपासून धो-धो पाऊस बरसला आहे. या पावसाचे रौद्र रुप पाहून ढगफुटीचं झाल्याचं नागरिकांकडून सांगितलं जात आहे.

परतीच्या पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांतील शेतजमीनी जलमय झाल्या आहेत. नद्यांवर बांधण्यात आलेल्या पुलांचं पाणी शेतात शिरल्याचं चित्र आहे.. मानेवाडी येथील बंधारा फुटल्याने अंमळनेर-पाथर्डी रस्त्यावरील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. काही प्रमाणात हा पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झालीयं. मागील 80 वर्षांत असा पाऊस कधीच झालेला नाही. या पावसामुळे सोयाबीन, उडीद बाजरी मका, संत्रा संपूर्ण पिकांचं नुकसान झालं असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शेतकऱ्यांची जमीनच शिल्लक राहिली नाही, सर्व जमीन पाण्याखाली वाहून गेलीयं…त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना आता सरकारी मदतीची गरज निर्माण झाली आहे.