अतिवृष्टीने राज्यात हाहाकार, सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर; सरकारची मदत अपुरी, विरोधकांचा हल्लाबोल

Written by:Rohit Shinde
Published:
राज्यातील मराठवाडा-विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीमुळे कहर झाला आहे. शेती आणि पिकांचे नुकसान झाले असून सरकारने तुटपूंजी मदत जाहीर केल्याचे विरोधकांचे मत आहे.
अतिवृष्टीने राज्यात हाहाकार, सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर; सरकारची मदत अपुरी, विरोधकांचा हल्लाबोल

मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपून काढलं, ठिकठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारचे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्री देखील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. तर दुसरीकडे विरोधकांकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली जात आहे. शिवाय, सरकारने जाहीर केलेली 2 हजार कोटींची मदत तुटपूंजी असल्याचे मत विरोधकांचे आहे.

मराठवाडा, विदर्भात पुरस्थिती; शेतीचे नुकसान

दुष्काळाचे चटके सहन करणारा मराठवाडा सध्या ओल्या दुष्काळानं ओलाचिंब झाला आहे. धाराशीव, बीड, अहिल्यानगर, सोलापूर, लातूर, जालन्यात पावसाचं थैमान पाहायला मिळालं. ज्या मराठवाड्याला दुष्काळात रेल्वेनं पाणी पोहोचवावं लागलं होतं, तिकडे आता हेलिकॉप्टरमधून लोकांचं रेस्क्यू करण्याची वेळ आली आहे. मराठवाड्यात 1 जूनपासून आतापर्यंत सरासरीच्या 124 टक्के पाऊस पडला आहे. 22 सप्टेंबरपर्यंत सरासरी 604 मिमी पाऊस होत असतो. मात्र आता 747 मिमी इतका सरासरी पाऊस मराठवाड्यात झाला आहे. फक्त सप्टेंबरचा विचार करायचा 165 टक्के पाऊस मराठवाड्यात झाला आहे.

पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना 2 हजार 215 कोटींची मदत केल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याला दुजोरा दिला आहे. मात्र ही मदत तुटपूंजी असल्याचा दावा आता विरोधकांकडून करण्यात येत आहे. शिवाय, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे.

सरकारची मदत तुटपूंजी; रोहित पवार संतापले!

मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. राज्यातील अनेक भागांत शेतातल्या पिकांसह जमीनीही वाहून गेल्या आहेत. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी 2215 कोटी रुपयांची मदत जाहीर केलीयं. या मदतीच्या मुद्द्यावरुन आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलायं. एवढ्या अलिशान सरकारला एवढी तुटपुंजी मदत शोभते का? असा थेट सवाल पवार यांनी ट्विटद्वारे केलायं.

तसेच 31.5 लाख शेतकऱ्यांसाठी 2215 कोटींची मदत म्हणजे सरासरी शेतकऱ्याला 7000 रुपये दिले आहेत. शेतकऱ्यांना देण्यात आलेली मदत 8500 प्रती हेक्टर म्हणजेच 3400 रुपये एकरी प्रमाणे देण्यात आलीयं. एकरी 3400 रुपयांत काय होणार? असा सवाल उपस्थित करत आमदार रोहित पवारांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. शिवाय पलीकडे जात मदत करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर फिरणारे सरकार आगामी काळात तरी शेतकऱ्यांना भरीव मदत करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. फक्त शेती आणि पिकांचे नुकसान झाले नसून अनेकांचे संसार उघड्यावर पडल्याचे चित्र सध्या राज्यात आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews