सप्टेंबर महिन्यात राज्यात अतिवृष्टीचा कहर; शेती आणि पिकांची मोठी हानी, हादरवणारे आकडे समोर

Written by:Rohit Shinde
Published:
सप्टेंबर महिन्यात राज्यात रेकॉर्डब्रेक पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. या काळात शेती आणि पिकांच्या झालेल्या नुकसानीचे हादरवणारे आकडे समोर आले आहेत.
सप्टेंबर महिन्यात राज्यात अतिवृष्टीचा कहर; शेती आणि पिकांची मोठी हानी, हादरवणारे आकडे समोर

सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातील बहुतांश भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे नद्या आणि ओढे तुडुंब भरून वाहू लागले. परिणामी, गावोगावी पूरस्थिती निर्माण झाली आणि अनेक कुटुंबांचे घरदार वाहून गेले. या आपत्तीत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असून, अनेक जण बेपत्ता आहेत. शेतकऱ्यांना तर या अतिवृष्टीने मोठा फटका बसला आहे. शेतमाल पाण्याखाली गेला, उभी पिके नष्ट झाली आणि मातीची धूप झाल्याने शेतजमिनींचे मोठे नुकसान झाले. याबाबतची हादरवून टाकणारी आकडेवारी आता समोर आली आहे. त्याबाबत जाणून घेऊ…

शेती आणि पिकांची मोठी हानी; शेतकरी संकटात

या काळात पावसाने सरासरी ओलांडली, अतिवृष्टी झाली. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना या काळात मोठा फटका बसला. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये या काळात हेक्टरमध्ये झालेले नुकसानीचे आकडे….

सप्टेंबरमध्ये राज्यात किती नुकसान? ( हेक्टरमध्ये )

जळगाव- 11664, नाशिक- 14035 ,बुलढाणा- 64682, संभाजीनगर- 166226, अहिल्यानगर – 578798, बीड- 571100, सोलापूर – 351437, जालना- 375973, अमरावती- 2673, धाराशिव- 181200, लातूर -8805, परभणी- 56836, वाशिम- 38541, नागपूर 1016, वर्धा- 22960, चंद्रपूर-3630, यवतमाळ – 137568, हिंगोली- 9500, सांगली- 3535, पुणे- 273, सातारा- 320

अतिवृष्टीनं कोणत्या पिकांचं नुकसान?

विदर्भात या अतिवृष्टीच्या काळात प्रामुख्याने कापूस, भात, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका, ऊस, फळपिके आणि भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले आहे.
मराठवाड्यात सोयाबीन, तूर, कापूस, ऊस, उडीद, बाजरी, कांदा, फळपिके आणि भाजी ही पिके मातीमोल झाली. प. महाराष्ट्रात कापूस, ऊस, कांदा, बाजरी, सोयाबीन, मका, तूर, उडीद, फळपिके आणि भाजीपाला या पिकांना फटका बसला. उ. महाराष्ट्रात कांदा, कापूस, सोयाबिन, भुईमूग, बाजरी, फळपिके आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. कोकणात भात, नाचणी आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले.

राज्यभरात पुरामुळे 41 हजार नागरिकांचे स्थलांतर

पुरामुळे 41 हजार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आले. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.  सोलापूर जिल्ह्यात 13,724 , जालना 8,500 , संभाजीनगर 8,029 ,  धाराशिव 3,957 , अहिल्यानगर 3,497 , बीड 2,000 , नांदेड 1, 020 अशा प्रकारे नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.

अभुतपूर्व नुकसान, भरीव मदत करण्याची मागणी

महाराष्ट्रात या अभुतपूर्व आणि अनेक वर्षांचे रेकॉर्ड मोडीत काढणाऱ्या पावसामुळे मोठे नुकसान झाले. अनेक कुटुंबं आणि शेतकरी देशोधडीला लागले. काही ठिकाणी नुकसानीचे पंचनामे सुरू असून, काही ठिकाणी नागरिकांना मदत वितरीत केली जात आहे. मात्र केली जाणाऱ्या मदत तुटपूंजी असल्याने भरीव अशा मदतीची मागणी केली जात आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews