गृहमंत्री अमित शाह सहकुटुंब ‘लालबागच्या राजा’च्या चरणी, भाजपाच्या ‘या’ नेत्यांनीही घेतलं राजाचे दर्शन

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
गेल्या अनेक दशकांपासून लालबागचा राजा मंडळ भाविकांना एकत्र आणत आहे. यंदाही मंडळानं उत्कृष्ट व्यवस्था केली आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून एकता आणि बंधुभाव वाढवण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.
गृहमंत्री अमित शाह सहकुटुंब ‘लालबागच्या राजा’च्या चरणी, भाजपाच्या ‘या’ नेत्यांनीही घेतलं राजाचे दर्शन

Amit Shah : मुंबईसह राज्यात सध्या गणपती सणाची धामधूम आहे. मुंबईत लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी देशातून भाविक येतात. दरम्यान, आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचं सहकुटुंब दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगा जय शाह, सून आणि नातवंडे उपस्थित होती. दर्शनानंतर लालबागच्या राजा मंडळाकडून अमित शहा यांच्या सत्कार करण्यात आला. तर दुसरीकडे लालबागच्या राजाचं दर्शन भाजपाच्या राज्यातील अनेक बड्या नेत्यांनाही घेतलं.

सांस्कृतिक व धार्मिक वारशाचा अविभाज्य भाग

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गणपतीचे दर्शन घेतले, त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या मंडळीनीही दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांनी  लालबागच्या राजाच्या मंडळाच्या व्यवस्थापनाचं कौतुक केलं आणि गणेशोत्सवाच्या शांततापूर्ण आयोजनासाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिलं. “लालबागचा राजा हा मुंबईच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. येथील भक्ती आणि उत्साह पाहून मनाला आनंद होतो.” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नवसाला पावणारा गणपती अशी ओळख

दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील गेल्या कित्येक वर्षांपासून लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात. अमित शाह यांनी शनिवारी सकाळी लालबागच्या राजाच्या मंडपात येऊन पूजा-अर्चना केली आणि गणरायाच्या चरणी नतमस्तक झाले. त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या कार्याचं कौतुक केलं. तसेच लालबागचा राजा, ज्याला ‘नवसाला पावणारा गणपती’ म्हणून ओळखलं जातं. हा मुंबईतील गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू आहे. दरवर्षी लाखो भाविक या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी लालबाग इथं येतात. मंत्री आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा यांनीही यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.