या हल्ल्याकडे स्थानिक पोलिसांचं दुर्लक्ष कसं? प्रवीण गायकवाड हल्ल्यावरुन विधानसभेत विरोधक आक्रमक

Written by:Astha Sutar
Published:
आरोपींना कायद्याची अजिबात भीती नाही. त्यांनी कायदा हातात घेतला आहे. कायदा आपल्याला काहीही करू शकत नाही, हा आरोपींचा अविर्भाव होता, तो ठेचला गेला पाहिजे.
या हल्ल्याकडे स्थानिक पोलिसांचं दुर्लक्ष कसं? प्रवीण गायकवाड हल्ल्यावरुन विधानसभेत विरोधक आक्रमक

Mansoon Session : आजपासून पावसाळी अधिवेशनाचा अंतिम आठवड्याला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी आज विधानसभेत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरुन आक्रमक झाल्याचे पाहयला मिळाले. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळं फासण्यात आले. तसेच त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. यावरुन विरोधक आक्रमक झाले आणि सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला होत असताना स्थानिक पोलिसांचं दुर्लक्ष कसं? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला.

हल्ल्याकडे पोलिसांचं दुर्लक्ष कसं?

दरम्यान, आरोपींना अटक केली आहे, पण त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. प्रवीण गायकवाड यांना मारून टाकण्याचा आरोपींचा प्रयत्न होता. जो व्यक्ती राज्यासाठी समाजात निर्भीडपणे काम करत आहे, त्यांच्यावर असा हल्ला हा कसा काय होऊ शकतो? स्थानिक पोलिसांचं या हल्ल्याकडे दुर्लक्ष कसं काय? असा सवाल काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत उपस्थित करत सरकारच्या गृहविभागावर टीका केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि आरोपींना कठोरात कठोर शासन केले जाईल,

असं निवेदन मुख्यमंत्र्यांनी सभागृहात द्यावे, अशी विनंती यावेळी वडेट्टीवार यांनी केली. तर ‘ प्रवीण गायकवाडांचे कार्यकर्ते पुढे आले नसते तर, त्यांची विकेटच होती’ अशी प्रतिक्रिया हल्ल्यावर आमदार जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे.

योग्य कारवाई केली जाईल…

दुसरीकडे या हल्यानंतर पोलिसांमध्ये फिर्याद नोंदवण्यात आली आहे, फिर्यादीची दखल घेऊन पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक केली आहे. आरोपी अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहे. आरोपी कुठेही गेले नाहीत. या ठिकाणी जी घटना घडलेली आहे, त्यामुळे आरोपीला कोणती कलम लावता येतील…. कोणती शिक्षा केली जाईल… हे बघून त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मात्र प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्लानंतर सर्वत्र निषेध करण्यात येत असून, यावरुन आज सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews