Marathi News

मुंबईत समुद्राच्या किनारी गणपती विसर्जन करताना सावधान; महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी

Written by:Rohit Shinde
Published:
मुंबई येथील समुद्राच्या किनारपट्टीवर 'ब्लू बटन जेलीफीश', 'स्टिंग रे' प्रजातीच्या माशांच्या वावरासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
मुंबईत समुद्राच्या किनारी गणपती विसर्जन करताना सावधान; महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी

गणपती विसर्जनाच्या काळात बऱ्याचदा मुंबईमध्ये समुद्र किनारी भागात समुद्री जीवांमुळे अथवा माशांमुळे नागरिकांना इजा होत असते. अशा घटना जरवर्षी घडतात. काही नागरिकांना यामध्ये जीव देखील गमावावा लागतो. णेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनारी येणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये, या उद्देशाने मुंबई येथील समुद्राच्या किनारपट्टीवर ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांच्या वावरासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. नेमक्या या मार्गदर्शक सूचना काय आहेत, त्यांची गरज का भासते, याबाबत सविस्तर जाणून घेऊ…

महापालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी

गणेश विसर्जनादरम्यान ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांच्या दंशापासून बचाव तसेच घ्यावयाच्या काळजीसंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. यासोबतच गणेशमूर्ती विसर्जनस्थळी समन्वयात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आले आहेत. ब्ल्यू बटन जेलीफिश आणि स्टिंग रे प्रजातीच्या माशांच्या संभाव्य वावराच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिल्या आहेत.

मार्गदर्शक सूचनांमागे कारण काय?

मुंबई येथील समुद्राच्या किनारपट्टीवर ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांच्या वावरासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मत्स्यव्यवसाय विभागाला विचारणा करण्यात आली होती. त्यानुसार, मत्स्यव्यवसाय विभागाने गणेशमूर्ती विसर्जनादरम्यान मुंबई येथील समुद्रात ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांचा वावर असतो आणि नागरिकांना मत्स्यदंश होऊ शकतो. यापासून बचावासाठी उपाययोजना करावी, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिकेला केली होती.

महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना काय?

गणेश विसर्जन हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नेमणूक करण्यात आलेल्या जीवरक्षक व यंत्रणेमार्फत करावे. गणेश विसर्जनादरम्यान गणेश भक्तांनी उघड्या अंगाने समुद्रात प्रवेश करू नये. पायाला मत्स्यदंश होऊ नये म्हणून गमबुटांचा वापर करावा.गणेश भक्तांना उपरोक्त सुचनांचे पालन करण्यासाठी चौपाट्यांवर उपलब्ध असलेल्या नागरी गणेशोत्सव प्रणालीचा वापर करण्यात यावा. गणेशमूर्ती विसर्सनाच्या ठिकाणच्या वैद्यकीय कक्षांमध्ये मत्स्यदंशाच्या अनुषांगीक आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करून ठेवावा. नागरिकांच्या जनजागृतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने चौपाट्यांवर लावण्यात आलेल्या सूचना फलकांवरील सूचना तसेच उद्घोषकांद्वारे देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी कटाक्षाने पालन करावे.लहान मुलांना पाण्यामध्ये जावू न देण्याची खबरदारी घ्यावी.

मस्त्यदंशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात वैद्यकीय कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच एक 108 रूग्णवाहिका काही ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. याशिवाय, नागरिकांनी पुढील काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews