अमरावती– अमरावतीत महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर ज्या राणांच्या नावानं खडे फोडले, त्याच राणांना सोबत घेऊन आता महापौरपद मिळवण्याची वेळ भाजपावर आलीय. भाजपच्या माजी खासदार, मुलुखमैदानी तोफ नवनीत राणा यांनी अमरावती महापालिका निवडणुकीत उघडपणे पती रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षासाठी प्रचार केला. यामुळं स्वाभाविकच भाजपाचे कार्यकर्ते, उमेदवार दुखावले गेले.
महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पराभूत उमेदवारींनी नवनीत राणा यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी केली. थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं. मात्र अवघ्या काही तासातच यातली चूक भाजपाच्या पराभूत उमेदवाराना लक्षात आली आणि त्यांनी पत्रावर सहीच केला नसल्याचा दावा केला. नवनीत राणा यांनाच पाठिंबा असल्याचे व्हिडीओही शेअर करण्याची वेळ त्यांच्यावर आलीय.
निकाल काय सांगतो?
हे सगळं घडलं ते अमरावती महापालिकेच्या लागलेल्या निकालामुळे
अमरावती महापालिकेचा निकाल
एकूण जागा – 87
भाजपा – 25
शिंदे शिवसेना- 03
अजित पवार राष्ट्रवादी – 11
युवा स्वाभिमान- 15
काँग्रेस- 15
एमआयएम- 12
शिंदे शिवसेना- 03
ठाकरे शिवसेना- 02
बसपा – 03
वंचित-02
राणांनी काय साधलं?
निकालात कुणालाच बहुमत मिळालं नाही. युवा स्वाभिमानचे नेते रवी राणा यांनीच आता भाजपचा महापौर होण्यासाठी पुढाकार घेतलाय. भाजप, युवा स्वाभिमान, शिंदे शिवसेना, बसपा आणि ठाकरे शिवसेनेला सोबत घेऊन राणा नवी राजकीय खेळी करु पाहतायेत. अजित पवार राष्ट्रवादी, काँग्रेस आणि एमआयएम हे विरोधी बाकांवर दिसतील अशी शक्यता निर्माण झालीय. आता मॅजिक फिगर मॅच गाठण्यासाठी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाला सोबत घेणं गरजेचं झालंय. त्यामुळं आधी स्वबळाचा नारा देणाऱ्या भाजपसमोरही काही पर्यायही राहिलेला नाही.
भाजपला भूमिका बदलण्याची वेळ कशासाठी?
राणा दाम्पत्याच्या या खेळीमुळे भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मात्र नाराज असल्याची चर्चा आहे. 2017ला झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपचे 45 नगरसेवक निवडून आले होते, तर युवा स्वाभिमान पक्षाला केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. 2019 लोकसभा निवडणुकीच्या वेळी युवा स्वाभिमान पक्षात असलेल्या नवनीत राणाांनी भाजपात प्रवेश केल्या आणि त्या खासदार झाल्या. 2024 च्या निवडणुकीत त्यांचा पराभवही झाला. विधानसभेपर्यंत भाजपाचा प्रचार करणाऱ्या राणांनी अमरावती महापालिका निवडणुकीत रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा प्रचार केल्यानं नाराजी वाढली. मात्र सत्तेसाठी पुन्हा राणांच्याचच पक्षाची गरज निर्माण झाल्यानं, पुन्हा त्यांनाच पाठिंबा देण्याची वेळी भाजपा कार्यकर्त्यांवर आलीय.





