मुंबईत गणेशोत्सव मंडळांवर खड्डा कर, महापालिकेकडून दंड 15 हजारांवर, मंडळाचे पदाधिकारी नाराज

Written by:Smita Gangurde
Published:
दंडाच्या रकमेत तब्बल साडे सात पट वाढ करण्यात आली अनेक सार्वजनिक मंडळांकडून या निर्णयाविरोधात संताप व्यक्त करण्यात येतोय.
मुंबईत गणेशोत्सव मंडळांवर खड्डा कर, महापालिकेकडून दंड 15 हजारांवर, मंडळाचे पदाधिकारी नाराज

मुंबई- राज्याचा मुख्य उत्सव असलेला गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपला आहे. अमेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये लगबग सुरु झाली आहे. घरोघरीही गणरायाच्या आगमनासाठी आत्तापासून तयारी सुरु झाली आहे. मुंबई-पुण्यासह राज्याच्या इतर शहरांत सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.

यावर्षी मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा मुद्दा तापला होता. मात्र आता मुंबई हायकोर्टानं समुद्रात 6 फुटांवरील मोठ्या मूर्ती विसर्जनाची परवानगी दिल्यानं गणेशओत्सव मंडळांना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या एका निर्णयामुळे गणेशोत्सव मंडळांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येते आहे.

मुंबई महापालिका आकारणार खड्डा कर

मुंबई महापालिकेनं गणेशोत्सवाच्या मंडपांसाठी खणल्या जाणाऱ्या एका खड्ड्यासाठीचा दंड हा 2 हजारावरुन थेट 15 हजार रुपये केलाय. यावरुन गणेशोत्सव मंडळांमध्ये नाराजीचा सूर आहे. हा भरमसाठ दंड रद्द करण्याची मागणी आता गणेशोत्सव मंडलांकडून करण्यात येतेय.

मुंबई महापालिकेचा कोणता नवा दंड नियम?

मुंबईत रस्त्यावर, पदपथावर खड्डा खणल्यास मंडळांना दंड आकारला जातो. खड्ड्याच्या दंडाची रक्कम 2 हजार रुपयांवरुन 15 हजार करण्यात आली. दंडाच्या रकमेत तब्बल साडे सात पट वाढ करण्यात आली अनेक सार्वजनिक मंडळांकडून या निर्णयाविरोधात संताप व्यक्त करण्यात येतोय.

समन्वय समितीच्या बैठकीत रोष

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीर नुकतीच दादरमध्ये गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीतही या निर्णयाविरोधात रोष पाहायला मिळाला. पालिका जर हा अवास्तव दंड आकारणार असेल. तर मग मुंबईतल्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांवरुन कंट्राटदारांवर सुद्धा कारवाई करा, असा सूर यातून पुढे आलाय. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने हा ‘खड्डा कर’ म्हणजे हिंदू सणांवर लादलेला जिझिया कर असल्याचं म्हटलंय.

मंडळांचं आर्थिक गणित बिघडणार

मुंबईत रस्त्याच्या कडेला, फुटपाथवर मंडप टाकून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची संख्या मोठी आहे. अशात ही अवाढव्य दंडाची रक्कम, या मंडळांचं आर्थिक गणित बिघडवणारी ठरणार आहे.. त्यामुळे गणेशोत्सवाआधीच मंडप उभारणीच्या कामात अडथळा आलाय, आता यातून सरकार आता मार्ग काढणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मुंबई महापालिका निवडणुका तोंडावरर असताना गणेशोत्सव मंडळांची ही नाराजी सरकारला परवडणारी नाही. त्यामुळं यावर उपाय काढण्यात येईल, अशी शक्यता आता वर्तवण्यात येतेय.