वरळी सी-फेस येथील पुनर्विकास प्रकल्पात अनियमितता, आमदार आदित्य ठाकरेंची सभागृहात कारवाईची मागणी

Written by:Astha Sutar
Published:
प्रकल्पाबाबत कोणतीही स्पष्टता नाही असे आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी. अशी विनंती ठाकरेंनी अध्यक्षांना केली.
वरळी सी-फेस येथील पुनर्विकास प्रकल्पात अनियमितता, आमदार आदित्य ठाकरेंची सभागृहात कारवाईची मागणी

Aditya Thackeray –  वरळी सी-फेस, खान अब्दुल गफार खान मार्ग येथील सुभेदार रामजी आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्पात सुरू असलेल्या कथित अनियमिततांवर आमदार आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला. गेल्या १५ वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाचा पुनर्विकास सुरू झाला असला तरी, अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, याबाबत सरकारने तातडीने लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.

मूळ आराखडा अचानक बदलण्यात आला

दरम्यान, हा पुनर्विकास प्रकल्प चार ते पाच विकासकांनी बदलल्यानंतर आता सुरू झाला आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून प्रकल्पबाधितांना मिळणारे भाडे थकले आहे. तसेच, शासनाच्या जीआरमध्ये नमूद केलेला आणि झोपडपट्टीधारकांना दाखवण्यात आलेला मूळ आराखडा अचानक बदलण्यात आला आहे. या बदलांमुळे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. आमदारांनी निदर्शनास आणून दिले की, कोणतीही पूर्वपरवानगी न घेता विक्रीसाठीच्या इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे, बंगल्यांचेही बांधकाम सुरू आहे, तर दुसरीकडे पुनर्वसनासाठीची इमारत अजूनही बंदच आहे, असं ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख मागण्या…

  • प्रकल्पबाधितांचे थकीत भाडे (रेट) तात्काळ देण्यात यावे…
  • मूळ आराखड्यानुसार (प्लॅन) बांधकाम करण्यात यावे; ज्यामध्ये विक्रीची इमारत मागे आणि दुकानांची (शॉप) इमारत पुढे होती, त्याच क्रमाने बांधकाम व्हावे.
  • सर्वप्रथम दुकानांची इमारत बांधून ती दुकानदारांना सुपूर्द करावी…
  • ७० टक्के शासनाच्या जागेबाबत स्पष्टता आणावी.
  • या गंभीर आरोपांवर आणि मागण्यांवर शासनाने तातडीने लक्ष घालून योग्य ती पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.