अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये कबूतरखान्याचा प्रश्न गाजतोय. या आंदोलनादरम्यान काही कबुतरांचा मृत्यू झालाय आणि त्यांच्या आत्मशांतीसाठी आज जैन धर्मियांकडून मुंबईमध्ये धर्मसभा भरविण्यात आली होती. या धर्मसभेनंतर उपस्थित असणाऱ्या सर्व जैनमुनींनी एकत्र पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली. जनकल्याण राजकीय पक्षाची घोषणा यावेळी करण्यात आली, शिवाय या पक्षाचे चिन्हं कबुतर असणार आहे असं देखील सांगण्यात आलं आहे.
मुंबईत जैन मुनींची मोठी घोषणा
सरकारला माझा नाही, सनातन धर्माचा इशारा आहे. मराठी माणूस कबुतरांना विरोध करत नाहीय. त्यांना राजकारणासाठी कबूतर आणायचे आहे. आम्ही आमचा धर्म विसरणार नाही, असं जैनमुनी निलेशचंद्र विजय म्हणाले. तसेच जैन समाज सर्वाधिक टॅक्स भरतो, असंही निलेश मुनी यांनी सांगितले. आता आमची देखील संघटना असणार आहे. आम्ही महापालिकेत आमचे उमेदवार उभे करू…कबुतरांची पार्टी पाहिजे, शिवसेनेतही वाघ होता, असं म्हणत निलेश मुनींकडून जन कल्याण पार्टीची घोषणा करण्यात आली. आमच्या पार्टीचं चिन्ह कबूतर असेल, अशी घोषणा निलेशचंद्र विजय यांनी केली.
मनसेकडून निर्णयावर टीकेची झोड
मनसे नेते अविनाश अभ्यंकर म्हणाले की, याचा अर्थ तुम्ही मुंबईवर हक्क सांगणार की काय? टॅक्स भरताय म्हणजे काय? संपूर्ण देशात महाराष्ट्रातील जमीन सुपीक आहे. मराठी माणूस हा मान मोडेपर्यंत इमानाने काम करतो. तो कुणालाही फसवून बँकेला बुडवून परदेशात जात नाही. तो ज्याच्याकडे काम करतो त्याच्याकडे अत्यंत इमानाने काम करतो. हे मराठी माणसाचे योगदान आहे. मराठी माणसाने अत्यंत सहिष्णूपणे इतर प्रांतीयांना इकडे जागा दिली आणि तेच आता मुंबईवर हक्क सांगण्याचा डाव करत आहेत, असे त्यांनी म्हटले.
माझं या सगळ्यांना अतिशय नम्रपणे सांगणं आहे की, तुम्ही इतरांना ज्ञान देत आहात ना. मग तुमच्या मंदिराला लावलेल्या जाळ्या काढून टाका. कशाला चॅलेंज करत आहात. डॉक्टर आणि शास्त्रज्ञ मूर्ख आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. असा सवाल मनसे नेत्यांकडून या प्रकरणात उपस्थित करण्यात आला आहे, आता यावर आगामी काही दिवसांत मोठा गदारोळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.





