बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन मागे; 2 ऑक्टोबरचं अल्टिमेटम, उदय सामंत यांची शिष्ठाई

Written by:Smita Gangurde
Published:
शुक्रवारी चंद्रशेखर बावनकुळे आणि शनिवारी उदय सामंत यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आंदोलन तूर्तास स्थगित करण्याची घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे.
बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन मागे; 2 ऑक्टोबरचं अल्टिमेटम, उदय सामंत यांची शिष्ठाई

अमरावती – शेतकऱ्यांना कर्जमाफी, दिव्यांग यांच्या मागण्यांसाठी गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेलं प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू यांचं अन्नत्याग उपोषण अखेर त्यांनी मागे घेतलंय. शुक्रवारी चंद्रशेखर बावनकुळे आणि शनिवारी उदय सामंत यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आंदोलन तूर्तास स्थगित करण्याची घोषणा बच्चू कडू यांनी केलीय.

कर्जमाफीची तारीख जाहीर करण्याची त्यांची मागणी होती, मात्र हा निर्णय तातडीनं घेतला जाणं शक्य नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्यानंतर 2 ऑक्टोबरची मुदत कडू यांनी सरकारला दिली आहे. सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत तर 2 ऑक्टोबर रोजी थेट मंत्रालयात घुसण्याचा इशारा कडू यांनी दिला आहे.

बच्चू कडू होते उपोषणावर ठाम

कर्जमाफीच्या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या बच्चू कडू यांनी गेल्या सात दिवसांपासून अन्नत्याग उपोषण केलं होतं. या उपोषणामुळं त्यांची प्रकृतीही खालावली होती. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याची सूचना केली होती. मात्र कडू त्यांच्या उपोषणावर ठाम होते. कर्जमाफीची घोषणा केली नाही तर 16 जूनपासून पाणी त्याग करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची शुक्रवारी भेट घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचं बोलणं करुन दिलं होतं. त्यानंतर कडू यांनी शनिवारी निर्णय जाहीर करणार असल्याचं जाहीर केलं होतं.

शनिवारी सकाळी बच्चू कडू यांचे समर्थक राज्यभरात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात कडू यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला. त्यानंतर बच्चू कडू यांच्या भेटीला उदय सामंत दाखल झाले. सरकार कडू यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक असल्याचं सांगितलं. त्यानंतर कडू यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली.

यापुढे महाराष्ट्रात दौरे करणार- बच्चू कडू

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर एकजूट व्हा असं आवाहन आंदोलन तूर्तास स्थगित करताना बच्चू कडू यांनी केलंय. यापुढे या प्रश्नावर रान पेटवणार असून राज्यभरात दौरे करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. कोणत्याही पक्षात राहा, कोणत्याही नेत्याचा सन्मान करा, मात्र शेतकऱ्यांचा मुद्द्यावर एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी केलंय.