जळगाव – गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या हनी ट्रॅपच्या मुद्द्याला आता राजकीय वळण मिळताना दिसतंय. हनी ट्रॅपशी संबंधित दुसऱ्या एका प्रकरणात जळगावातील भाजपा पदाधिकारी प्रफुल्ल लोढा याला काही दिवसाांपूर्वी अटक करण्यात आली आहे. या लोढा आणि महाजनांचे संबंध असल्याचा आरोप एकनाथ खडसे आणि संज राऊत यांनी केला होता. त्यावर महाजन आणि खडसेंमध्ये वाद रंगलाय.
एकनाथ खडसे यांनी केलेल्या आरोपानंतर गिरीश महाजन यांनी खडसे यांच्या मुलाच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केली होती. त्यावरुन आता एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना प्रतिआव्हान दिले आहे. गिरीश महाजनांना खडसेंनी तीन चॅलेंजेस दिली आहेत.
खडसेंची महाजनांना कोणती चॅलेंजेस
गिरीश महाजन यांनी खडसेंच्या मुलाच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करावी, असं पहिलं चॅलेंज खडसेंनी महाजनांना दिलंय. यासह महाजनांनी त्यांच्या मालमत्तेचीही चौकशी करावी, असं आव्हानही खडसेंनी दिलंय. अटक करण्यात आलेल्या प्रफुल्ल लोढा याची नार्को टेस्ट करावी, त्यातून सत्य बाहेर येईल, असं आव्हानही खडसेंनी महाजनांना दिलंय.
महाजनांचं नाव महिलांच्या बाबत का येतं?-खडसे
गिरीश महाजनांचं नाव महिलांबाबत सातत्यानं का येतं, असा सवालही एकनाथ खडसे यांनी केला आहे. आपल्या मालमत्तेची चौकशी झाली, महाजन अशी चौकशी करण्यास तयार आहेत का, असा सावलही खडसेंनी महाजनांना केलाय. गिरीश महाजन हे अर्ध्या खात्याचे मंत्री असल्याचं सांगत त्यांनी टीका केली आहे. जळगावच्या विकासासाठी महाजनांनी केलेलं एक तरी काम दाखवावं, असं आव्हानही खडसेंनी केलंय.
आमदार मंगेश चव्हाण यांच्यावरही टीकास्त्र
एकनाथ खडसे यांचे अनेक महिलांशी संबंध होते, असा आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी केला होता. त्यालाही एकनाथ खडसेंनी प्रत्युत्तर दिलंय. याबाबतची एक छोटी गोष्टही समोर आणावी, नुसते आरोप काय करता, असा सवाल खडसेंनी केलाय. असे पुरावे दिले तर राजाकारणातून निवृत्त होईन असंही खडसे म्हणाले आहेत. या आरोप प्रत्यारोपांवरुन हे प्रकरण येत्या काळात आणखी तापण्याची शक्यता आता वर्तवण्यात येतेय.





