Marathi News

पावसातील अनियमितता, पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव; मराठवाडा, मध्य-महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत

Written by:Rohit Shinde
Published:
मध्य-महाराष्ट्र, मराठवाडा भागातील काही भागांत पुरेसा पाऊस नाही, तर काही ठिकाणी अधिकच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
पावसातील अनियमितता, पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव; मराठवाडा, मध्य-महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत

मध्य-महाराष्ट्र म्हणजेच प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागातील शेतकरी यंदा चांगलेच चिंतेत सापडले आहेत. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतातील सोयाबीन, कापूस, भुईमूग, उडीद अशा पिकांवर रोगांचा आणि किडीचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे, तर काही ठिकाणी कमी पावसामुळे पिके करपूर गेली आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटे कोसळले आहे. जालना, बीड भागात परिस्थिती चिंताजनक आहे.

राज्यातील बळीराजा अडचणीत, मदतीची अपेक्षा

कधी सततचा पाऊस, त्यामुळे ओल्या दुष्काळाने शेती पाण्याखाली जाते, तर कधी पावसाच्या अभावामुळे पिकं करपून जातात. राज्यात बळीराजाच्या नशिबी सततचे हालच लिहीले की काय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती दिसत आहे. अशीच काहीशी परिस्थिती  बीड जिल्ह्यातही उद्बवली असून सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. तीन दिवसाच्या पावसाने उभी कपाशी करपून गेल्याने हुंदके देत शेतकऱ्याने पीकं उपटून फेकली. बळीराजा हवालदिल झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

बीड जिल्ह्यातील काही भागात सतत तीन दिवस झालेल्या पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले आहे. गेवराई तालुक्यातील सुरळेगावचे शेतकरी ज्ञानेश्वर काळे यांचे तीन दिवसाच्या पावसाने 4 एकर शेतातील उभी कपाशी करपुन गेली आहे.तर दुसरीकडे या नुकसानीचे पंचनामे करायचे सोडून तुमचा व्हिडिओ व्हायरल होऊ द्या, मग पाहणी करू, पंचनामा करू अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसा संताप देखील पाहायला मिळत आहे.

शेतकऱ्यांना तात्काळ सरकारी मदतीची गरज

मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी ओढे आणि छोटे मोठे नाले दुथडी वरून वाहू लागले तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतातही पाणी साचल्याने अनेक ठिकाणी खरीप हंगामातील कपाशी,सोयाबीन,तूर यासह अनेक पिके पाण्याखाली गेली. मात्र आता ही पाण्याखाली गेलेली पिके संकटात सापडली आहे. शेतातून पाण्याचा निचरा लवकर होत नसल्याने ही पिके काळी पडून त्यांच्यावर मर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उभी पिके शेतकऱ्यांच्या हातातून जात आहे.महागड्या औषधांची फवारणी करून देखील या रोगांवर नियंत्रण मिळविता येत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.

याचदरम्यान मायबाप सरकारने तात्काळ पाहणी करून पंचनामा करून आम्हाला मदत करावी, अशी मागणी शेतकरी ज्ञानेश्वर काळे यांनी केली आहे. चार दिवसात मदत नाही आली तर आत्महत्या करणार, असा इशारा काही शेतकरी देत आहेत. आता शेतकऱ्यांच्या या मागणीला सरकारचा काही प्रतिसाद मिळतो का ते पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews