Marathi News

अतिवृष्टीने बाधित जिल्ह्यांत कर्ज वसूली तूर्तास बंद; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची मोठी घोषणा

Written by:Rohit Shinde
Published:
संकट कोसळलेल्या बळीराजासाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने नुकसानग्रस्त भागातील कर्जवसुली थांबवणार असल्याचं सांगितलं आहे.
अतिवृष्टीने बाधित जिल्ह्यांत कर्ज वसूली तूर्तास बंद; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची मोठी घोषणा

ष्काळाचे चटके सहन करणारा मराठवाडा सध्या ओल्या दुष्काळानं ओलाचिंब झाला आहे. धाराशीव, बीड, अहिल्यानगर, सोलापूर, लातूर, जालन्यात पावसाचं थैमान पाहायला मिळालं. ज्या मराठवाड्याला दुष्काळात रेल्वेनं पाणी पोहोचवावं लागलं होतं, तिकडे आता हेलिकॉप्टरमधून लोकांचं रेस्क्यू करण्याची वेळ आली आहे. मराठवाड्यात 1 जूनपासून आतापर्यंत सरासरीच्या 124 टक्के पाऊस पडला आहे. 22 सप्टेंबरपर्यंत सरासरी 604 मिमी पाऊस होत असतो. मात्र आता 747 मिमी इतका सरासरी पाऊस मराठवाड्यात झाला आहे. फक्त सप्टेंबरचा विचार करायचा 165 टक्के पाऊस मराठवाड्यात झाला आहे. त्यानंतर आता कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

कर्ज वसूली तुर्तास बंद -भरणे

राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत काही बँका थकबाकी वसुलीसाठी तगादा लावत आहेत. यावर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना विचारले असता त्यांनी म्हटलं, ज्या भागात नुकसान झालं आहे… तिथे कर्जवसुली तात्काळ थांबवली पाहिजे. यासाठी राज्य सरकार बँकांना सूचना देणार आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट झाली आहेत. कुणाचं घर वाहून गेलं, कुणाची गुरे-ढोरे वाहुन गेली आहेत. होतं नव्हतं सर्व गमावलं आहे. इतकं मोठं संकट कोसळलेल्या बळीराजासाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने नुकसानग्रस्त भागातील कर्जवसुली थांबवणार असल्याचं सांगितलं आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ओला दुष्काळ नाही?

थोडक्यात राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत सरकार सद्यस्थितीला तितके सकारात्मक नसल्याचे चित्र आहे. हे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवरून स्पष्ट होते. दुसरीकडे विरोधक मात्र ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी सातत्याने करताना दिसत आहेत. त्यामुळे सरकारी मदत नेमकी किती मिळणार आणि त्याचा शेतकऱ्यांना नेमका किती फायदा होणार, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित राहिला आहे.

सरकारची मदत तुटपूंजी; रोहित पवार संतापले!

मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. राज्यातील अनेक भागांत शेतातल्या पिकांसह जमीनीही वाहून गेल्या आहेत. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी 2215 कोटी रुपयांची मदत जाहीर केलीयं. या मदतीच्या मुद्द्यावरुन आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलायं. एवढ्या अलिशान सरकारला एवढी तुटपुंजी मदत शोभते का? असा थेट सवाल पवार यांनी ट्विटद्वारे केलायं.

तसेच 31.5 लाख शेतकऱ्यांसाठी 2215 कोटींची मदत म्हणजे सरासरी शेतकऱ्याला 7000 रुपये दिले आहेत. शेतकऱ्यांना देण्यात आलेली मदत 8500 प्रती हेक्टर म्हणजेच 3400 रुपये एकरी प्रमाणे देण्यात आलीयं. एकरी 3400 रुपयांत काय होणार? असा सवाल उपस्थित करत आमदार रोहित पवारांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. शिवाय पलीकडे जात मदत करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews