मुंबईत पावसामुळे लोकलसेवा विस्कळीत; अनेक भागांत साचले पाणी

Written by:Rohit Shinde
Published:
मुंबई शहर आणि उपनगरीय भागात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे लोकल रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले असून अनेक भागांत पाणी साचले आहे.
मुंबईत पावसामुळे लोकलसेवा विस्कळीत; अनेक भागांत साचले पाणी

मुंबई: मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात सध्याही मुसळधार पावसाचा जोर सुरू आहे. सोमवार उजाडल्यानंतर आकाशात गडद ढगांची दाटी असून, पुढील काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. परिणामी, सामान्य मुंबईकरांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. पहाटेपासून सुरू असलेल्या पावसाचा फटका रेल्वेलाही बसला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांत पाऊस

सोमवारी पहाटे 2 ते 5 वाजेच्या दरम्यान दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस झाला. यामुळे शहरातील अनेक सखल भाग पाण्याखाली गेले असून, काही ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली आहे. त्यामुळे हवामान खात्याने दिवसभरासाठी ऑरेंज अलर्ट कायम ठेवला आहे. मुंबईकरांना आज दिवसभर पावसाचा असाच सामना करावा लागणार आहे.

राज्यात पावसाची काय स्थिती? 

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सुरु असलेल्या पावसामुळे कमाल तापमानात घट झाली आहे. तर दुसरीकडे आज रायगड जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. रायगडमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये सोमवारी ‘यलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे.

तसेच गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या नागपूर, विदर्भ परिसरात आज मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सोमवार ते गुरुवार या चार दिवसांदरम्यान विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आता विदर्भवासियांना पावसामुळे चांगला दिलासा मिळणार आहे. या पट्ट्यातील शेतीच्या कामांना देखील वेग मिळणार आहे. बऱ्यात काळापासून या भागातील शेतीची कामे खोळंबलेली आहेत. त्यामुळे आता नागरिकांची आणि शेतकऱ्यांची चांगल्या पावसाची प्रतीक्षा लवकरच पूर्ण होणार आहे.