मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली आहे. मुंबईत गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शहराची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनला पूर्णपणे ठप्प केले आहे. मध्य रेल्वेची ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यानची सेवा पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. केवळ लोकलच नव्हे, तर लांब पल्ल्याच्या गाड्या आणि विमान सेवांवरही या पावसाचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे शहरातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना देखील मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शहरातील लोकल सेवा विस्कळीत
जोरदार पावसामुळे मध्य रेल्वेच्या कुर्ला आणि दादर स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. ‘अप’ आणि ‘डाऊन’ दोन्ही मार्गांवर पाणी जमा झाल्यामुळे वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. यामुळे कुर्ला, सायन, आणि दादरच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना ठाणे स्थानकावर अडकून पडावे लागले आहे. गेल्या दोन तासांपासून हे प्रवासी लोकल सुरू होण्याची वाट पाहत आहेत. सध्या केवळ ठाणे ते कल्याण या मार्गावर लोकल सेवा अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे.
याचबरोबर, हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली आहे. पनवेल ते मानखुर्दपर्यंतच हार्बर रेल्वे सुरू आहे. त्यामुळे मुंबईकडे जाण्यासाठी वाशी स्थानकावर अनेक प्रवासी अडकून पडले आहेत. लोकलच्या व्यतिरिक्त लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांनाही या पावसाचा मोठा फटका बसला आहे. रुळांवर पाणी साचल्यामुळे अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात काही महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे.






