Lake Ladki scheme : लेक लाडकी योजनेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही असे चित्र आहे. गेल्या वर्षी महायुतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली होती. या योजनेला राज्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तर दुसरीकडे त्याआधी आणलेल्या ‘लेक लाडकी योजने’कडे मात्र लोकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसते आहे. त्यामुळं लेक लाडकी योजनेला कमी प्रतिसाद मिळाल्याची आकडेवारीतून स्पष्ट होतेय. 

एकूण लाभार्थी किती?

पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारक असणाऱ्या कुटुंबात जन्मलेल्या मुलींना या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने म्हटलेय. पण एप्रिल २०२४ ते जून २०२५ आतापर्यंत केवळ १ लाख ७० हजार मुलींनाच या योजनेचा लाभ मिळाला आहे. किंवा १ लाख ७० हजार लोकांनीच या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळं लाडक्या बहिणीच्या योजनेच्या तुलनेत ‘लेक लाडकी’ या योजनेला कमी प्रतिसाद मिळाला आहे. किंबहुना योजनेकडे लोकांनी पाठ फिरवली चित्र दिसून येत आहे.

योजना कशासाठी आणली होती…

दरम्यान, स्त्रीभ्रूण हत्येला आळा बसावा आणि मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढावे… मुलींचा मृत्यू दर कमी व्हावा… मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी… बालविवाह रोखणे… कुपोषण कमी करणे आणि शाळाबाह्य मुलींची संख्या शून्यापर्यंत आणण्यासाठी तसेच मुलींच्या जन्माचे स्वागत व्हावे… मुलांप्रमाणे मुलींच्यांही जन्माचे स्वागत व्हावे…  याकरिता राज्य सरकारने ‘लेक लाडकी योजना’ ही आणली आहे.

सर्वांत लाभार्थी कोणत्या जिल्ह्यात?

लेक लाडकी योजना मुलीच्या जन्मापासून १८ वर्षांपर्यंत त्या मुलीला या योजनेतून लाभ मिळणार आहे. १ एप्रिल २०२३ नंतर ज्या मुलींचा जन्म झाला आहे, त्या मुली लेक लाडकी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आतापर्यंत या योजनेत १ लाख ७० हजार मुलींना लाभ मिळाला आहे. तर सर्वांधिक लाभ घेण्यात मुंबई शहर मागे आहे. मुंबईत केवळ या योजनेचा १६५ मुलींनी लाभ घेतला आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्ये सर्वांधिक म्हणजे १० हजार ३६१ मुलींना योजनेचा लाभ मिळाला आहे.