गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, कोकण आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने नागरिकांच्या नाकी नऊ आले आहेत. दरम्यान कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची दैना उडाली. लोकल सेवा बंद झाली. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूक खोळंबली. दरम्यान उद्या २० ऑगस्ट रोजी राज्यातील अनेक जिल्ह्याला रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
उद्यादेखील सुट्टी जाहीर…
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात उद्या २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उद्या 20 ऑगस्ट 2025 रोजी अतिवृष्टीसह रेड अलर्ट जारी केला आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखडं यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच खासगी व अनुदानित शाळांना उद्या 20 ऑगस्ट 2025 रोजी सुट्टी लागू राहील. नागरिकांनी हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
पावसामुळं बदलापूर-अंबरनाथ जलमय…
कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर येथील सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे साचलेल्या पाण्यातून वाट काढताना लोकांना त्रास होत आहे. मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, गरज असेल तरच घराबाहेर पडा, असा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तर गेल्या 24 तासात पडत असल्या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळं कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले.





