Maharashtra Municipal Corporation Election 2026 : राज्यभरात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. 29 महापालिकांतील प्रत्येक प्रभागात सरासरी चार पक्षांचे उमेदवार कार्यकर्त्यांसह घरोघरी प्रचार करतायेत. सकाळ, दुपार, संध्याकाळ प्रचार रॅली, सभा, घराघरात संवाद, पत्रक वाटपाचा कार्यक्रम सुरु आहे. सकाळी 9 वाजता सुरु होणारं हे प्रचाराचं काम रात्री उशिरापर्यंत सुरु आहे. त्यामुळे राज्यात हजारो पुरुष आणि महिला कार्यकर्ते सध्या अक्षरश: दिवसभर राबतायेत.

अशा प्रचाराचा दिनक्रम सकाळी 9 ला सुरु होतो आणि रात्री उशिरापर्यंत प्रचार सुरु असतो. या कार्यकर्त्यांच्या सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्री जेवणापर्यंतची व्यवस्था उमेदवार घेतात. त्यासाठी निरनिरळ्या ठिकाणी निरनिराळी व्यवस्था करण्यात आलेली आहे.

नाश्त्यासाठी पोहे, वडापाव, उपमा, लापशी

अनेक उमेदवारांचे कार्यकर्ते सकाळी नाश्ता करुन दिवसाच्या प्रचाराला सुरुवात करतात. यात सर्वाधिक मागणी ही वडापावला आहे. ज्या वडापाव विक्रेत्यांची दिवसाला 300 वडापावची विक्री होते, तो आकडा प्रचाराच्या काळात 1200, 1500 पर्यंत पोहचलाय.

तसंच सकाळच्या वेळेला पोहे. उपमा यासारख्या नाश्तांची मागणीही वाढलेली आहे. उमेदवारांच्या प्रचार कार्यालयात किंवा प्रचार रॅलीत जिथं जागा असेल त्या ठिकाणी या नाश्ताच्या व्यवस्था करण्यात येतेय. काही उमेदवारांनी पोळी-भाजी केंद्राशी या दिवसांसाठी टाय अप केलेलं आहे. हे दुकानदार किंवा कॅटरर्स दरदिवशी या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयात नाश्ता आणून देतायेत. काही ठिकाणी उपवासासाठी साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे, लापशी अशीही व्यवस्था करण्यात आलेली आहे.

दुपारी बिर्याणी किंवा व्हेज थाळी

दुपारच्या कार्यकर्त्यांच्या जेवणासाठी व्हेज बिर्याणीची मागणी वाढलीय. त्यासोबत कोशिंबिर, पापडही दिले जातायेत. बुधवार, शुक्रवार अशा दिवशी चिकन बिर्यानीही कार्यकर्त्यांना मिळतेय. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांना दुपारच्या जेवणात व्हेज थाळीही देण्यात येतेय. वरण, भात, एखादी भाजी, पोळ्या आणि एखादा गोडाचा पदार्थ अशीही व्यवस्था आहे. दुपारचं जेवण साधं, रुचकर आणि पौष्टिक असावं याकडे उमेदवार व्यवस्थापकांचा कल आहे. अनेक उमेदवारांनी सभागृह, मंगल कार्यालय भाड्यानी घेतली आहेत. त्या ठिकाणी आचारी लावून सकाळपासून रात्री जेवणाच्या व्यवस्थेपर्यंत कार्यकर्त्यांची सोय करण्यात आलेली आहे.

रात्रीच्या भोजनाची रंगत

रात्रीच्या जेवणात अनेक ठिकाणी डाळ, राईस आणि चिकन-मटण अशी व्यवस्था करण्यात येतेय. बुधवार, शुक्रवार, रविवारी कार्यकर्त्यांचा थकवा घालवण्यासाठी काही विशेष व्यवस्थाही रात्रीच्या वेळेला करण्यात येतेय. दमलेले कार्यकर्ते एकमेकांशी गप्पा मारत दिवसभराचा प्रचार आणि दुसऱ्या दिवसाचं नियोजन करतायेत. त्यामुळे काही ठिकाणी तर ढाबेही रात्री उशिरापर्यंत सुरु आहेत.

पोटावर सुरु आहे प्रचार

रुचकर नाश्ता, अन्न यामुळे कार्यकर्ते खुशीत असले की ते प्रचारही जोरात करतात. त्यामुळे उमेदवारही आपल्या कार्यकर्त्यांच्या नाश्ता-जेवणाकडे कटाक्षानं लक्ष देतायेत. कार्यकर्त्यांना देण्यात येणाऱ्या या चांगल्या वर्तणुकीमुळे उमेदवारांबाबतचा जिव्हाळी वाढीस लागतोय. या सगळ्यामुळे सध्या कॅटर्स, पोळी भाजी केंद्र, आचारी, वडापाव, नाश्ता विक्रेते यांना सुगीचे दिवस आलेत.