पावसामुळे नुकसान झालेल्यांना मिळणार आर्थिक मदत; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा

Written by:Smita Gangurde
Published:
गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसानं राज्यातील 41 हजार हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालंय.
पावसामुळे नुकसान झालेल्यांना मिळणार आर्थिक मदत; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा

बारामती- अवकाळी, मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या पावसाचा जबर फटका महाराष्ट्राला बसला आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसानं राज्यातील 41 हजार हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालंय. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. त्यासोबतच पुराचा फटकाही अनेकांना बसलाय. पुराचं पाणी घरात आल्यानं संसार उद्ध्वस्त झाल्याचे प्रकारही समोर आलेत.

बारामतीत पावसासोबतच निरा कालवा फुटल्यानं मोठं नकसान झालंय. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यावेळी ज्यांच्या घरात पाणी शिरलं आहे, त्यांना सरकारकडून 10 हजारांची मदत देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली आहे.

बारामतीत अजित पवारांची घोषणा

अजित पवारांनी पुन्हा एकदा बारामतीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधताना लवकरच दिलासादयक घोषणा करण्यात येईल असं ते म्हणालेत. शेतीचं मोठं नुकसान झालंय, त्यासाठी पंचनामे करावे लागतील. त्यामुळं मदतीला वेळ लागेल असंही अझित पवारांनी ग्रामस्थांसमोर स्पष्ट केलंय. ज्यांच्या घरात पाणी गेलं त्यांना तात्काळ धान्य देण्यात येत आहे, लवकरच 10 हजारांची मदतही करण्यात येईल असं पवार म्हणालेत.

संपूर्ण राज्यातील पूरग्रस्तांना दिलासा?

बारामतीत निरा कालवा फुटल्यानंतर, त्याची पाहणी करताना अजित पवारांनी ही घोषणा केली. त्यामुळे ही मदत केवळ बारामतीपुरतीच मर्यादित असेल की संपूर्ण राज्यातील पूरग्रस्तांना लागू होईल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र सरकारी निर्णय झाला तर तो संपूर्ण राज्याला लागू होईल असं सांगण्यात येतंय.