विद्यार्थ्यांना देणार सैनिकी शिक्षण, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती..

Published:
आता राज्यातील विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे बेसिक प्रशिक्षण असेल.
विद्यार्थ्यांना देणार सैनिकी शिक्षण, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती..

राज्यात आता इयत्ता पहिलीपासूनच लष्कराचे बेसिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यातील पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आता सैनिकी शिक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. शालेय शिक्षण व माजी सैनिक कल्याण विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. माजी सैनिक, क्रीडा शिक्षक, राष्ट्रीय कॅडेट कोर स्काऊट गाईड्स हे विद्यार्थ्यांना हे लष्करी प्रशिक्षण देतील. त्यासाठी राज्यातील 2.5 लाख माजी सैनिकांची मदत घेणार असल्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले.

शिक्षणमंत्री दादा भुसे काय म्हणाले?

‘जिल्हा परिषदेच्या ४८ शिक्षकांना नुकतेच सिंगापूर येथे अभ्यास दौऱ्यासाठी पाठविले होते. तेथील शिक्षण व्यवस्थेमध्ये ‘राष्ट्र प्रथम’ ही संकल्पना आढळून आल्याचे या शिक्षकांनी सांगितले. महाराष्ट्रही शिक्षणात आमूलाग्र बदल करीत असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून ते दिसून येईल. त्यानुसार ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी पहिलीपासून सैनिकी शिक्षणाचे प्राथमिक स्तरावरील शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. त्यासाठी इयत्ता पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री भुसे यांनी दिली.याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, माजी सैनिक कल्याणमंत्री शंभुराज देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे यासंदर्भात लवकरच निर्णय जाहीर केला जाईल.’

विद्यार्थ्यांसाठी हेल्थकार्ड

विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीलाही प्राधान्य दिले जाणार असून, त्यासाठी हेल्थ कार्ड तयार केले जाणार असल्याचे व तपासणीत आजाराचे निदान झाल्यास, संबंधित विद्यार्थ्याला उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.

सहलीचे स्वरूप बदलणार

विद्यार्थ्यांच्या सहलीचे स्वरूप बदलणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सहली दरम्यान शेतकऱ्यांच्या बांधावर, बँकेत, रुग्णालयात विद्यार्थ्यांच्या भेटी आयोजित केल्या जातील व त्यांना व्यवहार ज्ञान दिले जाईल. तसेच, गड-किल्ल्यांवर नेऊन, गौरवशाली इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचवला जाईल, असेही ते म्हणाले.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews