भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून महाराष्ट्र अधिक सक्षमपणे उभा राहील, मुख्यमंत्र्यांना विश्वास

Written by:Smita Gangurde
Published:
शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटिबद्ध असून अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना भरघोस मदत करण्यात आली आहे. पुढील टप्प्यात दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबवून राज्याच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून महाराष्ट्र अधिक सक्षमपणे उभा राहील, मुख्यमंत्र्यांना विश्वास

मुंबई- येत्या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून महाराष्ट्र अधिक सक्षमपणे उभा राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात व्यक्त केला. महाराष्ट्र थांबणार नाही, महाराष्ट्र गतिशील राहील आणि संविधानाच्या बळावर सातत्याने प्रगतीकडे झेपावत राहील, असेही ते म्हणाले.भारताचे संविधान आणि लोकशाही मूल्ये यांच्या बळावरच आज भारत वेगाने प्रगती करत आहे. भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. असंही त्यांनी सांगितलंय.

दादरमध्ये शिवाजी पार्वक 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारीउपस्थित होते.

स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्ये भारतीय संस्कृतीत रुजलेली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पण करत, संविधान निर्मितीसाठी त्यांनी व संविधान समितीच्या सदस्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्ये भारतीय संस्कृतीत रुजलेली असून त्यांचे प्रभावी प्रतिबिंब भारतीय संविधानात दिसून येते, असे त्यांनी सांगितले.

भारताची महत्त्वपूर्ण जागतिक शक्ती व अर्थव्यवस्था म्हणून ओळख

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताकडे आज एक महत्त्वपूर्ण जागतिक शक्ती व अर्थव्यवस्था म्हणून पाहिले जात असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, हे यश संविधानाने दिलेल्या लोकशाही व्यवस्थेमुळेच शक्य झाले आहे. महाराष्ट्र ही संतांची आणि वीरांची भूमी असून छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या स्वाभिमानाच्या मूल्यांवर राज्याची प्रगती सुरू आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबईसह राज्यातील सर्व भागांमध्ये गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती होत असल्याचं त्यांनी सांगितलंय.

शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटिबद्ध

शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटिबद्ध असून अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना भरघोस मदत करण्यात आली आहे. पुढील टप्प्यात दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबवून राज्याच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात महाराष्ट्र नवे विक्रम प्रस्थापित करीत असून मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत प्रकल्प, समृद्धी महामार्ग आणि शक्तिपीठ महामार्ग यांसारखे प्रकल्प राज्याच्या विकासाला गती देणारे ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात ३० लाख घरांच्या निर्मितीचा विक्रम

अनुसूचित जाती-जमातींसह वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष योजना राबविण्यात येत असून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात ३० लाख घरांची निर्मिती हा एक विक्रम असणार आहे. सौर कृषी वाहिनी, सौरऊर्जेवर चालणारे कृषी पंप यामध्येही राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. “लाडकी बहीण” योजना, शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना यासह विविध लोकाभिमुख योजनांद्वारे समाजातील प्रत्येक घटकाचा विकास साधण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.