अचानक तब्येत खालावली, मनोज जरांगे रूग्णालयात; उद्याच्या दसरा मेळाव्याचं काय होणार?

Written by:Rohit Shinde
Published:
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या उद्याच्या दसरा मेळाव्याचं काय होणार असा सवाल या निमित्ताने निर्माण झाला आहे.
अचानक तब्येत खालावली, मनोज जरांगे रूग्णालयात; उद्याच्या दसरा मेळाव्याचं काय होणार?

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपलब्ध माहितीनुसार, त्यांना व्हायरल ताप झाला असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामुळे मराठा समाजाच्या उद्या होणाऱ्या भव्य दसरा मेळाव्याचं काय होणार, असा सवाल या निमित्ताने निर्माण झाला आहे. मात्र खुद्द जरांगेंची याबाबत एक मोठी अपडेट दिली आहे.

जरांगेंची तब्येत खालावली; दसरा मेळावा होणार?

गुरुवारी नारायण गड येथे होणारा दसरा मेळावा हा राज्यातील राजकीय-सामाजिक दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. विशेष म्हणजे, राज्य सरकारकडून हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर जरांगे पाटील यांचा हा पहिलाच दसरा मेळावा ठरणार आहे. त्यामुळे ते नेमकं काय बोलतात, कोणता पुढचा लढा उभा करतात याकडे राज्यभरातील मराठा समाज आणि राजकीय वर्तुळाचे डोळे लागलेले आहेत. राज्यातील सध्या मराठा-ओबीसी संदर्भातील वातावरण संवेदनशील असून, या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. उद्याच्या मेळाव्यात मनोज जरांगे पाटील काय घोषणा करणार आहेत, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जरांगे पाटील यांचा मेळावा राज्यातील राजकीय व सामाजिक चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. त्यांच्या तब्येतीमुळे अनेक चाहते चिंतेत असले तरी त्यांनी उपस्थित राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ही परिस्थिती सामाजिक, राजकीय तसेच मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी मोठे परिणाम घडवू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार -मनोज जरांगे

दसऱ्याच्या आदल्या दिवशीच तब्येत बिघडल्यामुळे मेळाव्यात उपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. परंतु स्वतः जरांगे पाटलांनीच स्पष्ट केलं आहे की, “आजारी असलो तरी परंपरा मोडणार नाही, अ‍ॅम्ब्युलन्समधून जावं लागलं तरी मी दसरा मेळाव्यात हजर राहीन.” राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यातच जरांगे पाटलांच्या भाषणातून पुढील आंदोलनाची दिशा काय असेल, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. त्यामुळे नारायण गडवरील हा मेळावा राज्याच्या राजकीय समीकरणांना नवा कलाटणी देणारा ठरतोय, असं स्पष्ट होत आहे.