Marathi News

मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला यश, मान्य झालेल्या मागण्या कोणत्या आहेत?

Written by:Astha Sutar
Published:
मनोज जरांगे-पाटील यांच्या आठपैकी सात मागण्या मान्य केल्यानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलन संपल्याची घोषणा केली आहे. तर आज आंदोलन समाप्तीची घोषणा झाल्यानंतर मराठा आंदोलक गुलाल उधळत गावाकडे निघाले आहेत.
मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला यश, मान्य झालेल्या मागण्या कोणत्या आहेत?

Maratha Reservation – मराठा आरक्षणासाठी मुंबईत गेल्या पाच दिवसांपासून मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे-पाटील हे आंदोलन करत होते. आज आंदोलनाचा पाचवा दिवस होता. दरम्यान, आज अखेर पाचव्या दिवशी आंदोलन संपले असून, पाचव्या दिवशी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला यश आले आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या आठपैकी सात मागण्या मान्य केल्यानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलन संपल्याची घोषणा केली आहे. तर आज आंदोलन समाप्तीची घोषणा झाल्यानंतर मराठा आंदोलक गुलाल उधळत गावाकडे निघाले आहेत.

कोणत्या मागण्या झाल्यात?

१) हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीला मान्यता, तातडीनं शासन निर्णय काढणार, याबाबत कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल.
२) सातारा, पुणे आणि औंध संस्थानांच्या गॅझेटच्या अंमलबजावणीबाबत जलदगतीने कार्यवाही करण्यात येईल
3) सप्टेंबर अखेरीपर्यंत मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेणार
4) मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांना आतापर्यंत 15 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. जे या मदतीपासून वंचित आहेत, त्यांना एका आठवड्यात मदत दिली जाईल, सरकारकडून आश्वासन
5) 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीशी संलग्न करणार.
6) तालुका स्तरावर वंशावळ समिती स्थापन करण्यास मान्यता
7) मराठा हे कुणबी आहेत, असा जीआर दोन महिन्यांत काढणार

गुलाल उधळत मराठा आंदोलक निघाले गावाकडे

दरम्यान, सरकारनं अध्यादेश दिल्यानंतर आंदोलन संपल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली. यानंतर गुलाल उधळत मराठा आंदोलक गावाकडे निघाले आहेत. जरांगे पाटील यांनी हा मसुदा मराठा आंदोलक टीममधील तज्ज्ञांना दाखवला आणि टीमने मसुदा मागण्यानुसार योग्य आहेत, हे मान्य केल्यानंतर मसुद्याला मान्यता दिली. पण मसुदा नाही एक तासात जीआर काढा त्यानंतरच जल्लोष करू अशी अटही जरांगे पाटलांनी ठेवली. त्यानुसार जीआर प्रसिद्ध झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी तुमच्या पाठींब्याने जिंकलो रे… असं घोषित करताच आझाद मैदान पाटील पाटील या घोषणांनी दुमदुमून गेले. तसेच मराठा आंदोलनकांकडून गुलाल उधळत जल्लोष करण्यात आला.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews