मराठा आंदोलकांकडून बेस्ट बसमध्ये प्रवाशास मारहाण; आंदोलनकर्त्यांनी बसची खिडकी आणि काचा फोडल्या

Written by:Astha Sutar
Published:
मराठा आंदोलकांकडून बेस्ट बसमध्ये प्रवाशास मारहाण; आंदोलनकर्त्यांनी बसची खिडकी आणि काचा फोडल्या

Maratha Reservation – मनोज जरांगे-पाटील हे मराठा आरक्षणासाठी मुंबईत गेल्या चार दिवसांपासून आंदोलन करतात. आज त्यांचा आंदोलनाचा चौथा दिवस आहे. या आंदोलनासाठी मुंबईत आलेल्या आंदोलकांना पुरेशा सुविधा पुरवल्या जात नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळं रस्त्यावर अंघोळी, रस्त्यांकडेला मांडलेली चूल. रेल्वे स्टेशनवर डान्स करणे, असं चित्र सध्या दिसत आहे. हे मराठा आंदोलक मुंबईतील विविध भागांमध्ये भटकताना दिसत आहेत. तसेच आंदोलकांकडून हुल्लडबाजी आणि गोंधळ घातला जात आहे. हे चित्र असताना आता मुंबईतील बेस्ट बसेसमध्ये मराठा आंदोलकांकडून प्रवाशास मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मारहाण व खिडकीच्या काचा फोडल्या

दरम्यान, मुंबईत मराठा आंदोलन सुरु झाल्यापासून आंदोलनकर्ते दक्षिण मुंबईत हुल्लडबाजी, गोंधळ, माध्यमकर्मींना त्रास देणे हे प्रकार सुरु असल्याची ताजी घटना असताना आता मुंबईतील सांताक्रूझ आगारातील बसमध्ये मराठा आंदोलक यांच्याकडून प्रवाशास मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान बेस्ट बसेसची खिडकी आणि काच फोडण्यात आली आहे. बसमार्ग क्रमांक 201, सिरीयल क्रमांक 35, बसगाडी क्रमांक 7867 असून, घटनेचे ठिकाण जुहू बस स्थानक असल्याची माहिती समोर येत आहे.

नेमका प्रकार कसा घडला?

सदर बसगाडी जुहू बस स्थानक येथे उभी असताना आणि बसगाडीत कर्मचारी नसताना मराठा आंदोलक आणि काही प्रवाशामध्ये वादविवाद झाला. मराठा आंदोलकांनी एका प्रवाशाला बसमध्ये खाली पाडून मारहाण केली. तसेच बसची उजव्या बाजूची मागून तिसऱ्या क्रमांकाची खिडकीची काच पण फोडली. वाद होत असल्याचा आवाज आल्याने कर्मचारी बसमध्ये जाऊन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण मराठा आंदोलक हुज्जत घालतच होते. त्यानंतर पोलीस मदत क्रंमाक 100 नंबरवर तक्रार देऊन पोलिसांना पाचारण करण्यात आले. परंतु पोलीस आल्यानंतर मराठा आंदोलक आणि वाद करणारे दोन प्रवाशी पण पळून गेले. त्यानंतर सदर बसगाडी उभी करून दुसऱ्या बसने प्रवाशी मार्गस्थ करण्यात आले.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews