सृजनात्मक, कल्पक व नाविन्यपूर्ण बदल करत नाट्यसंस्कृती जपण्याचं काम मराठी नाट्य परिषदेने केले, मंत्री आशिष शेलारांचे उद्गार

Written by:Astha Sutar
Published:
नाट्यसेवा हा आपला श्वास आहे तो न सोडण्याचा पती दिलीप कुलकर्णी यांचा सल्ला हा जीवनगौरव पुरस्कार घेताना प्रकर्षाने आठवतो. गुरु म्हणून लाभलेल्या प. सत्यदेव दुबे, विजया मेहता, मार्गदर्शक विमलताई राऊत, डॉ. काशिनाथ घाणेकर, नाट्यसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ व कुटुंबाचे आभार यावेळी नीना कुलकर्णी यांनी मानले.
सृजनात्मक, कल्पक व नाविन्यपूर्ण बदल करत नाट्यसंस्कृती जपण्याचं काम मराठी नाट्य परिषदेने केले, मंत्री आशिष शेलारांचे उद्गार

Ashish Shelar – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे कै. गोविंद बल्लाळ देवल स्मृती दिन प्रीत्यर्थ पुरस्कार सोहळा पार पडला. यात ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी व सुरेश साखवळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. नाट्यसंस्कृती परंपरेचं आपलं मूळ न सोडता कालानुरूप त्यात सृजनात्मक आणि कल्पक असे नाविन्यपूर्ण बदल करत आपली नाट्यसंस्कृती जपण्याचं काम अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने केले आहे. असं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यावेळी म्हणाले.

सांस्कृतिक चळवळीच्या वाटचालीत मैलाचा दगड…

दरम्यान, हा सोहळा सांस्कृतिक चळवळीच्या वाटचालीत मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त करताना शासनाच्या मदतीने सांस्कृतिकतेचा परीघ अधिक व्यापक करण्याचं आश्वासनही आशिष शेलार यांनी यावेळी दिले. त्याचाच एक भाग म्हणून नटराजाच्या सेवेसाठी आपलं अमूल्य योगदान देणाऱ्या कलावंतांचा हा सन्मान अभिमानाचा आहे, असं शेलार म्हणाले. ह्यावर्षी ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेते सुरेश साखवळकर यांना महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नाट्यसेवेचे फलित म्हणजे ‘जीवनगौरव पुरस्कार’

‘नाट्यसेवेत कार्यरत असताना मिळालेल्या जीवनगौरव पुरस्काराची खुमारी काही औरच असते’ या वाटचालीत मिळालेले समाधान आणि भाग्य मोलाचे असल्याचे ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती नीना कुलकर्णी यांनी भावना व्यक्त केल्या. ज्येष्ठ लेखक पु.ल. देशपांडे आणि छोटा गंधर्व या दोघांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून मी ही संगीत नाट्यसेवा केली. त्याचे फलित म्हणजे ‘जीवनगौरव पुरस्कार’ आहे, अशा भावना सुरेश साखवळकर यांनी व्यक्त केला.