Marathi News

पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी “गणित गुरुवार” उपक्रम, डिजिटल प्लॅटफॉर्मवर विद्यार्थी करणार गणिताचा सराव

Written by:Astha Sutar
Published:
हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाचा सातत्याने अभ्यास करण्याची गोडी निर्माण करणारा असेल. शिक्षक व पालक यांनाही विद्यार्थ्यांना समर्थपणे साथ देण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक आठवड्याला केलेल्या सरावामुळे विद्यार्थ्यांमधील गणिताची भीती दूर होऊन आत्मविश्वास निर्माण होईल.
पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी “गणित गुरुवार” उपक्रम, डिजिटल प्लॅटफॉर्मवर विद्यार्थी करणार गणिताचा सराव

BMC School – नागपूर वगळता आज राज्यातील सर्व शाळा सुरु होणार आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. यात मंत्री, खासदार, आमदार हे स्वागत समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, मुंबई पालिका शाळांमध्ये महत्वाचा निर्णय़ घेण्यात आला आहे. ’मिशन मेरिट’ उपक्रम अंतर्गत मुंबई पालिका व खान अकॅडमी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने पालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी “गणित गुरुवार” हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गणित विषयात शिस्त, सातत्य व प्रावीण्य मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे बोलले जात आहे.

भीती जाण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास उपक्रम

दरम्यान, पालिकेच्या सर्व शाळांतील इयत्ता ६ वी ते १० वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी प्रत्येक गुरुवारी रात्री ८ ते १० वाजेदरम्यान किमान ३० मिनिटे खान अकॅडमी या डिजिटल प्लॅटफॉर्मवर गणिताचा सराव करतील. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन स्पर्धेच्या युगात महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी यशस्वी व्हावेत, यासाठी महानगरपालिका शिक्षण विभाग सातत्याने प्रयत्न करीत असतो. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून “गणित गुरुवार” हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

“गणित गुरुवार” चा फायदा

पालक-शिक्षक सभा (PTM), व्हॉट्सऍप ग्रुप व शिक्षक-पालक संवादामुळे हा उपक्रम शालेय वेळेनंतरही प्रभावी होणार आहे आणि प्रत्येक घरात शिक्षणासाठी पूरक वातावरण निर्माण होणार आहे. खान अकॅडमी प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी घालवलेला वेळ व त्यांनी सराव केलेल्या कौशल्यांची नोंद केली जाईल. शिक्षण विभागामार्फत सर्व शाळांमध्ये याबाबत पाठपुरावा केला जाईल. गणिताच्या नियमित सरावातून प्रावीण्य निर्माण होते. या विषयाबाबत आंतरराष्ट्रीय संशोधन व खान अकॅडेमीच्या आकडेवारीनुसार, आठवड्यातील किमान ३० मिनिटे सरावामुळे विद्यार्थ्यांमध्ये लक्षणीय शैक्षणिक प्रगती होते.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews