सरकारी नोकरी अथवा पोलीस दलात भरतीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खरंतर एक गुडन्यूज समोर आली आहे. पोलीस दलात भरती होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, राज्यात 15 हजारांहून अधिक पदे भरली जाणार आहेत. पोलीस दलातील शिपाई भरती प्रक्रियेस काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर या भरती प्रक्रियेच्या संदर्भात 20 ऑगस्ट 2025 रोजी राज्य सरकारने जीआर काढला. त्यानंतर आता यामध्ये पुढील कार्यवाही खरंतर सुरू करण्यात आली आहे. नेमकी भरती प्रक्रिया कधी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
15,631 पदांसाठी मेगाभरती होणार
या भरती प्रक्रियेबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस भरतीची प्रक्रिया 22 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत रिक्त झालेली आणि 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत रिक्त होणारी 15631 पदे भरतीकरीता उपलब्ध होणार आहेत. यानिमित्ताने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरूण वर्गाला मात्र मोठा दिलासा मिळणार आहे.
भरती प्रक्रियेचा संपूर्ण तपशील
यामध्ये जी पदे भरली जाणार आहेत. त्यामध्ये पोलीस शिपाई – 12399, पोलीस शिपाई चालक – 234, बॅण्डस्मन – 25, सशस्त्र पोलीस शिपाई – 2393, कारागृह शिपाई – 580 अशा प्रकारे ही पदे खरंतर भरली जाणार आहेत. त्यामुळे यामध्ये आणखी काही घडामोडी घडतात, ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या 4 मे 2022 आणि 21 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयातील तरतूदींमधून शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती सन 2024-25 ची भरती प्रक्रिया घटकस्तरावरुन राबविण्यास तसेच OMR आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
2022 आणि 2023 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरीता अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठीही या पूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 450 रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 350 रुपये इतके परीक्षा शुल्क आकारण्यास तसेच परीक्षा शुल्क स्वरुपात जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेकरीता खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पोलीस भरतीची अनेक वर्षांपासून तयारी करणाऱ्या तरूणांना आता यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.





