मुंबईतील लोकल रेल्वे ही लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी आहे. मात्र दर रविवारी देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी रेल्वे प्रशासन मेगाब्लॉक जाहीर करते. या मेगाब्लॉकमुळे लोकल सेवा ठप्प होते किंवा गाड्या विलंबाने धावतात. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. अनेक प्रवासी नोकरी, व्यवसाय किंवा वैयक्तिक कारणासाठी रविवारीही प्रवास करतात. मात्र मेगाब्लॉकच्या वेळी त्यांना पर्यायी मार्ग शोधावा लागतो. रेल्वे प्रशासनाकडून पूर्वसूचना दिली जाते तरीही गर्दी, उशीर व असुविधा टाळता येत नाही. अशा परिस्थितीत आता उद्याच्या दिवसाबाबत मोठा अपडेट समोर येत आहे. उद्या रविवारी 21 सप्टेंबर रोजी मुंबईतील मध्य आणि हार्बर मार्गावर लोकल रेल्वेचा मेगाब्लॉक असणार आहे.
रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक
मध्य आणि हार्बर रेल्वेने रविवारी देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी नियोजित ब्लॉक जाहीर केला असून त्यामुळे अनेक लोकल गाड्यांच्या फेऱ्यांवर परिणाम होणार आहे. रेल्वे प्रशासनानुसार या काळात ट्रॅक व सिग्नलच्या देखभालीची महत्त्वाची कामे करण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी या दरम्यान सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 या वेळेत ब्लॉक असेल. या कालावधीत CSMT ते पनवेल व बेलापूरकडे जाणाऱ्या तसेच परतीच्या दिशेच्या गाड्या रद्द राहणार आहेत. तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल या दरम्यानच्या लोकल्स देखील बंद राहतील. मात्र CSMT ते वाशी आणि ठाणे ते वाशी/नेरूळ मार्गावरील सेवा नियमित सुरु राहणार आहे.
हे ही वाचा
मध्य रेल्वेव्यतिरिक्त पश्चिम रेल्वेनेही वसई रोड ते विरारदरम्यान ब्लॉक जाहीर केला आहे. हा ब्लॉक शनिवारी रात्री 12.15 पासून रविवारी पहाटे 4.15 पर्यंत राहील. या दरम्यान धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येतील. काही लोकल रद्द करण्यात येणार असून काही लोकल्स उशिराने धावतील. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, हा ब्लॉक रात्रीच्या वेळेतच असल्यामुळे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नसेल. रेल्वे प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपले वेळापत्रक तपासूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
प्रवाशांना वेळापत्रक पाहून प्रवासाचे आवाहन
ऐन पावसाळ्याच्या दिवसांतील हा ब्लॉक असल्याने खरंतर प्रवाशांना या काळात मोठा मनस्ताप सहन करावा लागत असतो. अशा परिस्थितीत उद्या म्हणजेच रविवारी प्रवाशांनी प्रवास करताना रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे. शिवाय या काळात शक्य असेल तर प्रवाशांनी पर्यायी वाहनांचा अवलंब करणे आवश्यक आहे.