Marathi News

मुंबईत शनिवारी रात्री आणि रविवारी लोकल रेल्वेच्या मार्गावर मेगाब्लॉक; मेगाब्लॉकचे वेळापत्रक जाणून घ्या!

Written by:Rohit Shinde
Published:
मध्य रेल्वेने सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी शनिवार- रविवारी मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. या काळात शनिवारी रात्री आणि रविवारी मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.
मुंबईत शनिवारी रात्री आणि रविवारी लोकल रेल्वेच्या मार्गावर मेगाब्लॉक; मेगाब्लॉकचे वेळापत्रक जाणून घ्या!

मुंबईतील लोकल रेल्वे ही लाखो प्रवाशांची जीवनरेखा आहे. मात्र नियमित दुरुस्ती, ट्रॅक बदलणे किंवा देखभाल यासाठी रेल्वे प्रशासन मेगाब्लॉक जाहीर करत असते. अशा वेळी गाड्यांची वेळापत्रके बदलतात, अनेक गाड्या रद्द होतात किंवा उशिरा धावतात. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. कामावर, शाळा, कॉलेजला किंवा इतर महत्त्वाच्या कामासाठी जाणाऱ्या प्रवाशांना यामुळे त्रास होतो.

गर्दीतून प्रवास करणे कठीण होते आणि प्रवासाचा वेळ वाढतो. रेल्वे प्रशासनाकडून हा मेगाब्लॉक आवश्यक असला तरी प्रवाशांनी पर्यायी व्यवस्था करावी लागते. योग्य नियोजन न झाल्यास प्रवाशांचा संताप उफाळून येतो. शनिवारी म्हणजेच आज रात्री आणि रविवारी रेल्वेच्या हार्बर, मध्य मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे शक्यतो प्रवाशांनी प्रवास करताना रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

दुरूस्तीच्या कामांसाठी लोकल रेल्वेचा मेगाब्लॉक

मध्य रेल्वेने सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी शनिवार- रविवारी मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. कायमच वर्दळीचे स्टेशन म्हणून समजल्या जाणाऱ्या कुर्ला स्टेशनवर देखील मेगाब्लॉकच्या काळात अनेक काम केले जाणार आहे. कुर्ला स्टेशनवर एलिव्हेटेड हार्बर लाइन स्टेशन बांधण्यासाठी ट्रॅक डायव्हर्जनचे काम करणार आहे. हे काम ऐतिहासिक मानले जात असून अशा प्रकारचे काम बऱ्याच काळानंतर करण्यात येत आहे.

या काळामध्ये तब्बल साडे चौदा तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. शनिवारी रात्री 11:05 ते रविवारी दुपारी 01:05 मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल. साडे चौदा तासांच्या मेगाब्लॉकच्या काळामध्ये, वडाळा रोड- मानखुर्द दरम्यानची लोकल सेवा बंद राहील. या काळामध्ये हार्बर रेल्वेवर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. मेगाब्लॉकच्या काळामध्ये, हार्बर रेल्वेवरील कुर्ला स्थानक आणि टिळक नगर स्थानकादरम्यान प्रस्तावित रेल्वे डायव्हर्जनसाठी हार्बर लाईनचे ट्रॅक पुन्हा समरेखित केले जाणार आहे.

लोकलचे वेळापत्रक पाहूनच प्रवास करा

शनिवारी रात्री 10: 20 ते रविवारी दुपारी 02:19 पर्यंत सीएसएमटीवरून सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल रद्द राहतील. तर, शनिवारी रात्री 10:07 वाजेपासून रविवारी दुपारी 12:56 वाजेपर्यंत पनवेलहून सीएसएमटीला जाणारी सेवा रद्द असेल.डाऊन हार्बर मार्गावरून सीएमटीवरून वाशी/ बेलापूर/ पनवेलसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल शनिवारी रात्री 10:14 वाजता सुटेल. डाऊन हार्बर मार्गावरील ब्लॉकनंतरची पहिली लोकल सीएसएमटीवरून रविवारी दुपारी 01:30 वाजता सुटेल. ब्लॉकदरम्यान पनवेल- मानखुर्द- पनवेल दरम्यान विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत.

मध्य रेल्वेवरही मेगाब्लॉक आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी 09:00 ते दुपारी 01:00 या कालावधीत घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर जाणाऱ्या आणि येथून सुटणाऱ्या सुमारे 18 एक्स्प्रेस ठाणे आणि कल्याणदरम्यान धीम्या मार्गावर वळवल्या जातील. तर, पश्चिम रेल्वेवरील मेमू ट्रेन 10 ते 15 मिनिटांनी उशिराने धावतील. तसेच सकाळी 09:50 ची वसई रोड- दिवा मेमू गाडी कोपर स्थानकापर्यंत चालवण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकर प्रवाशांना काहीसा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews