महाराष्ट्रात उद्याचा दिवस मुसळधार पावसाचा; रविवारी कुठे-कुठे पाऊस कोसळणार? जाणून घ्या!

Written by:Rohit Shinde
Published:
उद्या म्हणजेच रविवारी 21 सप्टेंबरला राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. हवामान विभागाचा अंदाज सविस्तर जाणून घेऊ...
महाराष्ट्रात उद्याचा दिवस मुसळधार पावसाचा; रविवारी कुठे-कुठे पाऊस कोसळणार? जाणून घ्या!

20 ते 23 सप्टेंबर 2025 या काळात राज्यातील काही जिल्ह्यात विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अलर्ट जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. खरंतर या काळात राज्यातील 20 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्या म्हणजेच रविवारी 21 सप्टेंबरला राज्यातील पावसाची स्थिती नेमकी काय असणार आहे, ते सविस्तर जाणून घेऊ…

रविवारचा दिवस तुफान पावसाचा

मुंबई शहर आणि उपनगरामध्ये साधारणपणे ढगाळ आकाश राहील तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला हवामान विभागाने यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्गमध्ये ही विजांसह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे तर पुण्याचा घाटमाथा, सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये विजांसह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्याला हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. नाशिकचा घाट भाग, धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मध्यम पाऊस होऊ शकतो.

विदर्भ-मराठवाड्याला पाऊस झोडपणार!

मराठवाड्यातील सर्व आठही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी जोरदार तर कुठे मुसळधार पाऊस होऊ शकतो. विदर्भातील ही सर्व 11 जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे. विदर्भ आणि मराठवाडा या भागामध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

दरम्यान, राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होतेय. आगामी काळामध्ये देखील पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची तसेच जीविताची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या काळात खरंतर नागरिकांना विशेष सतर्कता बाळगावी लागणार आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews