सोमवारची सकाळ मुंबईकरांसाठी चांगलीची अडचणीची ठरली. घाटकोपर-वर्सोवा मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो सेवा विस्कळीत झाली, ज्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यातच, संत गाडगे महाराज चौक ते चेंबूर दरम्यान मोनो रेल्वे सेवा देखील ठप्प झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आणि कामावर जाणाऱ्यांचे वेळापत्रक कोलमडले.
घाटकोपर-वर्सोवा मेट्रोचा खोळंबा
तांत्रिक बिघाडामुळे घाटकोपर ते वर्सोवा या मार्गावरील मेट्रोची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर दुसरीकडे, मोनो रेल्वे मार्गावरील वाहतूकही एक तासाहून अधिक काळापासून ठप्प झाली आहे. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांची मोठी गैरसोई झाली असून प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी अथवा कार्यालयीन कामकाजास वेळेत उपस्थित राहणे जिकिरीचे बनल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
सकाळच्या वेळी मेट्रो वाहतूक विस्कळीत झाल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाल्याचे पाहायला मिळाले. मेट्रो गाड्या उशिराने धावत असल्याने घटकोपर स्थानकावर मोठी गर्दी झाली. मेट्रोने प्रवास करण्यासाठी प्रवाशांची भलीमोठी रांग लागली होती. पावसामुळे आधीच प्रवासात अडचणी निर्माण होत असतानाच मेट्रो मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अनेकांना नाराजी व्यक्त केली.
चेंबूर भागात मोनोरेल सेवा विस्कळीत
गाडगे महाराज चौक ते चेंबूर यादरम्यानची मोनो रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. ही वाहतूक नेमकी कशामुळे ठप्प झाली, याबाबत प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे. “तांत्रिक अडचणींमुळे मोनो मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून दोन गाड्यांमधील अंतर वाढले आहे. तांत्रिक समस्या दूर करण्यासाठी आमची टीम प्रयत्नशील असून प्रवाशांनी सहकार्य करावे,” असं आवाहन मोनो प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. एकंदरीत मुंबईकरांना आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठा मनस्ताप सहन करावा लागला.






