म्हाडाच्या 5354 सदनिका आणि 77 भूखंडांसाठी लवकरच सोडत; तारीख जाणून घ्या!

Written by:Rohit Shinde
Published:
ठाणे शहर, पालघरमधील वसई आणि सिंधुदुर्गमधील ओरोस येथील म्हाडाच्या एकूण 5354 सदनिका आणि 77 भूखंडांसाठी सोडत काढण्याची तारीख आणि वेळ निश्चित झाली आहे.
म्हाडाच्या 5354 सदनिका आणि 77 भूखंडांसाठी लवकरच सोडत; तारीख जाणून घ्या!

म्हाडामधून घर मिळविण्याचे स्वप्न हे महाराष्ट्रातील लाखो सामान्य नागरिकांचे सर्वात मोठे स्वप्न आहे. परवडणाऱ्या किमतीत स्वतःचे घर मिळावे, ही प्रत्येकाची इच्छा असते. एम्हाडा दरवर्षी लॉटरी आणि लिलावाद्वारे घरांचे वाटप करते. या प्रक्रियेत पारदर्शकता, न्याय्य पद्धत आणि सर्वसामान्यांना प्राधान्य दिले जाते. आता याच म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केलेल्या हजारो अर्जदारांना काहीसा दिलासा देणारी अशी एक बातमी समोर आली आहे.

म्हाडाच्या 5,354 सदनिका, 77 भूखंडांसाठी सोडत

मंडळाने आयोजित केलेल्या घरांच्या आणि भूखंडांच्या विक्रीसाठीच्या सोडतीचे सुधारित वेळापत्रक आता जाहीर करण्यात आले आहे. या नव्या वेळापत्रकानुसार ठाणे शहर, पालघरमधील वसई आणि सिंधुदुर्गमधील ओरोस येथील एकूण 5354 सदनिका आणि 77 भूखंडांसाठी सोडत काढण्याची तारीख आणि वेळ निश्चित झाली आहे. या सर्व सदनिका आणि भूखंडांच्या विक्रीकरिता आयोजित करण्यात आलेली संगणकीय सोडत दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी काढण्यात येणार आहे. ही सोडत ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे होणार आहे. सोडतीसाठी अनामत रकमेसह अर्ज प्राप्त झालेल्या पात्र अर्जदारांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

प्रारूप यादी प्रसिद्ध, कशी चेक करायची?

सोडतीसाठी स्वीकृत झालेल्या अर्जांची प्रारूप यादी 01 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://housing.mhada.gov.in) प्रसिद्ध केली गेली. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून अर्जदारांना 03 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत ऑनलाईन दावे आणि हरकती नोंदवता येतील. सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी 09 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजता ‘म्हाडा’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल.

या सोडतीसाठी नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. मंडळाला एकूण 1,84,994 अर्ज प्राप्त झाले आहेत, त्यापैकी अनामत रकमेसह 1,58,424 अर्ज प्राप्त झाले आहेत. हे अर्ज विविध ठिकाणांवरील सदनिका आणि भूखंडांसाठी आहेत. दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी सोडत झाल्यानंतर त्यामध्ये यशस्वी ठरलेल्या आणि प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जातील.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews